लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : के. टी. नगर येथील प्रभासकुमार या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून दि. १ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या 'क्लॅट' प्रवेश परीक्षेमध्ये एक प्रश्न चुकीचा विचारण्यात आला, असा दावा केला आहे. तसेच, या प्रश्नाकरिता एक गुण देण्यात यावा आणि त्यानुसार गुणवत्ता क्रमांकामध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे.
पाच वर्षीय बी. ए. एलएल. बी. अभ्यासक्रम प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये चार प्रकारच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्यापैकी 'प्रश्नपत्रिका ड'मध्ये ११८ वा प्रश्न चुकीचा विचारला गेला. यासंदर्भात सक्षम अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण त्यांनी दखल घेतली नाही, असे प्रभासकुमारचे म्हणणे आहे. त्याला या परीक्षेत अखिल भारतीयस्तरावर ४६० वा क्रमांक मिळाला आहे. ही याचिका प्रलंबित असेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी व प्रवेशप्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंतीदेखील त्याने न्यायालयाला केली आहे.
विधी विद्यापीठाला नोटीस या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राष्ट्रीय विधी विद्यापीठ संघाच्या संचालकांना नोटीस बजावून येत्या दि. २९ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.