पैशांशिवाय होत नव्हते काम ! ड्रॉवरमध्ये दिसल्या नोटा; महसूल मंत्र्यांनी सहदुय्यम निबंधकाला केले निलंबित
By योगेश पांडे | Updated: October 9, 2025 19:35 IST2025-10-09T19:35:01+5:302025-10-09T19:35:27+5:30
महसूल विभागाची कारवाई : महसूलमंत्री बावनकुळे यांनी घेतली होती झाडाझडती :

Work could not be done without money! Notes found in drawer; Revenue Minister suspends Joint Deputy Registrar
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोतवालनगरातील सहदुय्यम निबंधक अनिल कपले यांना कामातील हलगर्जी व गैरप्रकार भोवला आहे. त्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडलेल्या नोटांचा मुद्दा गंभीरतेने घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे निलंबन केले आहे. बावनकुळे यांनीच सोमवारी संबंधित कार्यालयात धाड टाकली होती व हा प्रकार समोर आला होता. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
रजिस्ट्रीसाठी कमिशनबाजी सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट रिंगरोडवरील कोतवालनगरातील गुलाब अपार्टमेंट येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ कार्यालयातच धडक दिली होती. तेथे दररोज मोठ्या प्रमाणावर रजिस्ट्री व इतर व्यवहार होत असतात. या कार्यालयात रजिस्ट्री करताना पैसे मागितले जातात. तसेच दस्त नियमित नसतानादेखील रजिस्ट्री लावल्या जातात, अशा तक्रारी बावनकुळे यांच्याकडे आल्या होत्या. यावेळी त्यांनी सहदुय्यम निबंधक अनिल कपले यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. कपले यांच्या टेबलवरील ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळली होती. त्याचप्रमाणे रजिस्ट्रीच्या प्रक्रियेतदेखील काही प्रमाणात अनियमितता आढळून आली. हा प्रकार महसूल विभागाकडून गंभीरतेने घेण्यात आला.
प्राथमिक चौकशीनंतर कपले यांना निलंबित करण्याचा निर्णय विभागाकडून जारी करण्यात आला. पुढील आदेश येईपर्यंत कपले निलंबित राहतील. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय सह जिल्हा निबंधक वर्ग-२, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक कार्यालय, अमरावती विभाग येथे राहील. तसेच कपले यांना पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीनंतर कपले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा नियमांचा भंग केला असे निदर्शनास आले. त्या आधारे महसूल विभागाने कारवाई केली असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.