पांढराबोडीत गुंडावर जीवघेणा हल्ला; एकतर्फी प्रेमातून देत होता त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 14:13 IST2022-02-10T13:57:22+5:302022-02-10T14:13:32+5:30
प्रेयसीने बोलणे बंद केल्यामुळे सतीश संतप्त झाला. तो मंगळवारी रात्री प्रेयसीच्या घरी पोहोचला. आपल्यासोबत येण्यासाठी तिला जबरदस्ती करू लागला, परंतु तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला.

पांढराबोडीत गुंडावर जीवघेणा हल्ला; एकतर्फी प्रेमातून देत होता त्रास
नागपूर : प्रेयसीला जबरदस्ती सोबत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात गोंधळ घालत असलेल्या कुख्यात गुंड सतीश चन्नेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री पांढराबोडीच्या जयनगरात घडली. पोलिसांनी प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांसह सहा आरोपींना अटक केली आहे.
सतीश अंबाझरी ठाण्याच्या परिसरातील कुख्यात आरोपी आहे. त्याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, बलात्कार, पोलिसांवर हल्ला यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात अनेकदा पोलीस जखमी झाले आहेत. सतीशचे एका युवतीशी प्रेमसंबंध होते. सहा महिन्यांपूर्वी युवतीचे कळमनात लग्न झाले. त्यावेळी सतीश तुरुंगात होता. जामीन मिळाल्यानंतर बाहेर पडताच, सतीश प्रेयसीच्या घरी पोहोचला. पती आणि इतर व्यक्तींना धमकी देऊन प्रेयसीला सोबत आणले. दोन महिने प्रेयसीला आपल्याजवळ ठेवले. दरम्यान, त्यांच्यात वाद होऊ लागला. त्यामुळे प्रेयसी सतीशला सोडून आईवडिलांकडे परत आली. तिने सतीशशी संबंध तोडले.
प्रेयसीने बोलणे बंद केल्यामुळे सतीश संतप्त झाला. तो मंगळवारी रात्री प्रेयसीच्या घरी पोहोचला. आपल्यासोबत येण्यासाठी तिला जबरदस्ती करू लागला, परंतु तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. सतीश तिला जबरदस्ती पकडून नेत होता. हे पाहून त्याच्या प्रेयसीचे कुटुंबीय आणि इतर नागरिक मदतीसाठी धावले. सतीशने त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर, प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी सतीशला पकडले. त्याच्यावर चाकूने वार केला. त्याचा खून करण्याचा त्यांचा डाव होता. शरीरावर १५ पेक्षा अधिक वार केल्यामुळे सतीश गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच, अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सतीशला रुग्णालयात पाठवून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी सतीशची प्रेयसी, तिचे आईवडील, भाऊ, तसेच साथीदार पलाश चौधरी आणि चंदु हटेवारला अटक केली.