धावत्या ट्रेनमध्ये वाद अन् रागात पत्नी तडक गाडीतून उतरली खाली

By नरेश डोंगरे | Updated: November 25, 2025 19:51 IST2025-11-25T19:50:08+5:302025-11-25T19:51:57+5:30

'रेल मदत'वर पतीने घातली साद : तात्काळ मिळाला मदतीचा हात

Wife gets out of the moving train in anger after argument | धावत्या ट्रेनमध्ये वाद अन् रागात पत्नी तडक गाडीतून उतरली खाली

Wife gets out of moving train in anger after argument

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
धावत्या ट्रेनमध्ये पती-पत्नीत वाद झाला. त्यानंतर रागात आलेली महिला तिच्या मुलीला घेऊन दुसऱ्या डब्यात निघून गेली. बराच वेळ झाला तरी ती जागेवर परतली नसल्याने पती हादरला. त्याने रेल मदत अॅपवर पत्नी मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. ती कळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधाशोध केली अन् काही वेळेतच हवालदिल झालेल्या पतीला त्याची पत्नी आणि मुलगी सुखरूप अवस्थेत मिळाली.

हावरा सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये मंगळवारी ही घटना घडली. प्रवास सुरू असताना पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. तो विकोपाला गेला आणि रागात आलेली पत्नी आपल्या लहान मुलीला घेऊन डब्यातून निघून गेली. बराच वेळ झाला तरी ती जागेवर परतली नाही. त्यामुळे हादरलेल्या पतीने शोधाशोध केली. तोपर्यंत गाडी नागपूर स्थानकावर आली. पतीने लगेच रेल मदत अॅपवर पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारवजा माहिती दिली. ही माहिती आरपीएफला कळाली. त्यावरून आरपीएफने गाडी थांबलेल्या फलाट क्रमांक ६ वरचे सीसीटीव्ही फुटेज तक्रारदाराला दाखविले. गाडीतून खाली उतरणारी पत्नी अन् मुलगी दिसताच त्या व्यक्तीने 'याच त्या' म्हणत आरपीएफला दोघींची ओळख सांगितली. सीसीटीव्हीतूनच त्या दोघी फलाट क्रमांक ६ वरून ८ वर जाताना दिसल्या. त्यांचा माग काढून त्या दोघींना बुकिंग ऑफिसजवळ ताब्यात घेतले. त्यांना आरपीएफच्या चाैकीवर आणण्यात आले.

समज-गैरसमज अन् समुपदेशन

विचारपूस केल्यानंतर पती-पत्नी दोघांनीही परस्पराविरुद्ध रोष व्यक्त केला. गाडीत झालेल्या वादाचे कारण किरकोळ असल्याचे लक्षात आल्यानंतर आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले. तुमच्या वर्तनामुळे मुलीवर काय दुष्परिणाम होऊ शकतात, त्याची कल्पना दिली. परस्परांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर आणि दोघांचेही समुपदेशन केल्यानंतर या दाम्पत्याने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी मुलीला घेऊन पुढच्या प्रवासासाठी गाडी धरली.
 

Web Title: Wife gets out of the moving train in anger after argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.