मित्रानेच का केली 'झुंड' फेम प्रियांशुची हत्या ? कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; वायरने गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
By योगेश पांडे | Updated: October 8, 2025 18:32 IST2025-10-08T18:30:46+5:302025-10-08T18:32:03+5:30
अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले होते काम : गुन्हेगारी वर्तुळातील मित्रानेच केला घात

Why did a friend killed Priyanshu of 'Jhund' fame? You will be shocked to hear the reason; Body found wrapped in wire
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘झुंड’ चित्रपटात त्यांच्यासोबत काम करणारा प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. गुन्हेगारी वर्तुळातील त्याच्या मित्रानेच घात केला व दारूच्या नशेत झालेल्या वादातून हत्या केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
‘स्लम सॉकर’चे प्रणेते विजय बारसे यांच्या प्रवासावर आधारित असलेल्या झुंड चित्रपटात प्रियांशूने फुटबॉल खेळाडूची भूमिका साकारली होती. मात्र तो अगोदरपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याविरोधात चोरीचे गुन्हेदेखील दाखल होते. त्याचा काही दिवसांपासून आराेपी ध्रुव शाहू याच्याशी पैशांवरुन वाद सुरु हाेता. दाेघांमध्ये एकदा मारामारीसुद्धा झाली हाेती. मात्र, मित्रांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला हाेता. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दोघेही नाराजवळच्या पडक्या निर्मनुष्य घरात दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पिताना ध्रुवने जास्त दारू घेतली व त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या शाहू व प्रियांशूमध्ये हाणामारी झाली आणि शाहूने प्रियांशूवर चाकूने वार केले.
गळ्यावरच वार झाल्याने प्रियांशू कोसळला. त्या अवस्थेत आरोपीने त्याला वायरने करकचून बांधले व फेकून दिले. वस्तीतील लोकांना पहाटे तो वायरने गुंडाळलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला मेयो इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा प्रियांशू शाहूसोबत बाहेर गेला होता अशी माहिती कळाली. पोलिसांनी शोधमोहीम राबवत शाहूला अटक केली. प्रियांशूच्या बहिणीच्या तक्रारीवरून शाहूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यसन, वाईट संगतीने केला घात
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी स्थानिक तरुणांना घेऊन झुंड चित्रपटाचे चित्रीकरण नागपूरमध्ये केले होते व त्यात प्रियांशूला संधी देण्यात आली होती. झुंड चित्रपटामुळे प्रियांशूला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला होता. त्याच्या मुलाखतीदेखील खूप गाजल्या होत्या. तो चांगला फुटबॉलपटूदेखील होता. झुंडमध्ये काम केल्यावरदेखील त्याची वाईट संगत कायम होती. त्याला दारूचे व्यसन होते. त्यासाठी तो चोरीदेखील करायचा.