गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर मोकाट कशे ? कारवाईच्या हेतूवर गंभीर प्रश्नचिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:49 IST2025-11-21T15:47:59+5:302025-11-21T15:49:13+5:30
गर्भलिंग निदान प्रकरण : दोनपैकी एकाच डॉक्टरला कारणे दाखवा

Why are doctors who perform gender determination free? Serious question marks over the motive behind the action
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या दोन डॉक्टरांवर मनपाच्या आरोग्य विभागाने शनिवारी धाडसी 'स्टिंग ऑपरेशन' करून त्यांना रंगेहाथ पकडले. परंतु, दोन दिवस उलटूनही दोषी डॉक्टरांवर 'गर्भलिंग निदान व प्रसूतिपूर्व चाचणी' (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे कारवाईच्या हेतूवर गंभीर प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. केवळ सोनोग्राफी करणारे डॉ. राजीव नागी यांना मंगळवारी 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली आहे, तर मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या डॉ. रेखा शिरसाट यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
मनपाच्या आरोग्य विभागाला बेकायदा लिंगनिदानाबाबत ठोस माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर १५ नोव्हेंबर रोजी एका गर्भवती महिलेच्या मदतीने अत्यंत गोपनीय 'स्टिंग ऑपरेशन' करण्यात आले. शिवम हॉस्पिटलमधील डॉ. रेखा शिरसाट यांनी लिंगनिदान करण्यासाठी ६० हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्याची तयारी दर्शविल्यावर डॉ. शिरसाट यांनी गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी सराफा चेंबरमधील त्यांच्या ओळखीच्या डॉ. राजीव नागी यांच्या सोनोग्राफी सेंटरवर एका एजंटच्या मदतीने पाठवले. डॉ. नागी यांनी सोनोग्राफी करून गर्भातील बाळाचे लिंग तपासून सांगितले. यानंतर एजंटने पेशंटला पुन्हा शिवम हॉस्पिटलमध्ये सोडले. हे सर्व पुरावे हाती येताच मनपाच्या पथकाने डॉ. नागी यांच्या सोनोग्राफी केंद्रावर धाव घेतली, मात्र क्लिनिक बंद होते आणि डॉ. नागी यांनी आपला फोनही बंद केला होता. मनपाच्या पथकाने तत्काळ सोनोग्राफी सेंटर सील केले. अलीकडच्या काळात बेकायदेशीर लिंगनिदानावर झालेली ही सर्वात मोठी आणि धडाकेबाज कारवाई होती.
दोषींवर निश्चितच कारवाई
शनिवारी कारवाई होऊनही सोमवारी या दोन्ही दोषी डॉक्टरांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. मंगळवारी केवळ सोनोग्राफी करणारे डॉ. राजीव नागी यांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली. शुक्रवारी पूर्ण माहिती व पुराव्यासह हे प्रकरण न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, 'पीसीपीएनडीटी' कायद्यानुसार दोर्षीवर निश्चितच कारवाई होईल.