उपाध्यक्ष कोण होणार? काटोल पालिकेत समसमान सदस्य संख्येमुळे पेच, कायद्याच्या कचाट्यात अडकणार का निवड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 19:49 IST2026-01-12T19:44:59+5:302026-01-12T19:49:54+5:30
Nagpur : नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेनंतर आता उपाध्यक्षपदावरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अर्चना देशमुख या नगराध्यक्षपदी निवडून आल्या.

Who will be the vice-chairman? Trouble due to equal number of members in Katol Municipality, will the election be caught in the legal quagmire?
लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेनंतर आता उपाध्यक्षपदावरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अर्चना देशमुख या नगराध्यक्षपदी निवडून आल्या. आता सदस्यसंख्येच्या गणितामुळे उपाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
२५ सदस्यांच्या नगरपरिषदेत १२ शेकाप-राष्ट्रवादी आघाडीने नगरसेवक निवडून आणले. भाजपला १३ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. नगराध्यक्षपद आघाडीकडे असल्याने दोन्ही बाजूंचे संख्याबळ प्रत्येकी १३ असे समसमान झाले आहे. त्यामुळे उपाध्यक्ष निवडणुकीत नेमका कौल कुणाच्या बाजूने लागणार, असा प्रश्न समोर आला.
राजकीय जाणकारांच्या मते, नगराध्यक्ष हे पीठासीन अधिकारी असल्याने त्यांना कास्टिंग व्होटचा अधिकार असल्यास आघाडीचे संख्याबळ १४ होऊ शकते. त्या जोरावर उपाध्यक्षपद आघाडीकडे जाऊ शकते. मात्र, जर कास्टिंग व्होटचा अधिकार नगराध्यक्षांना मिळत नसेल, तर १३-१३ अशा समसमान संख्येमुळे उपाध्यक्षपदाची निवड ईश्वरचिठ्ठीने होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रक्रियेवर कोणत्याही पक्षाने आक्षेप घेतल्यास न्यायालयात दाद मागितली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
या गोंधळाच्या वातावरणात कोणत्या पक्षाचा, कोणत्या नगरसेवकाचा उपाध्यक्षपदी नंबर लागतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षांतील इच्छुक नगरसेवक बाशिंग बांधून तयार असल्याची चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे उपाध्यक्ष हा कशा पद्धतीने होतो. यात राजकीय खोडा होतो की सामंजस्याने उपाध्यक्ष नेमणूक पार पडते. यावरही अनेक राजकीय गणिते पुढे येणार आहेत.
शेकाप-राष्ट्रवादी आघाडीकडे उपाध्यक्षपद गेले, तर शेकापचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे संदीप वंजारी यांचे नाव पुढे येऊ शकते. मात्र, मागील काही काळात त्यांची भाजपशी वाढलेली जवळीक आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चामुळे शेकाप नेतृत्व त्यांना पुढे करेल का, याबाबत संभ्रम आहे. तसेच आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची या निवडीबाबतची भूमिका काय असेल, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. शेकापचे नेते राहुल देशमुख यांच्यासाठी हा मोठा राजकीय कसोटीचा क्षण मानला जात आहे.
भाजपला संधी मिळाल्यास
भाजपच्या गटाला उपाध्यक्षपद मिळाले, तर भाजी नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांचे नाव आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपद भाजपच्या हातून गेले असले, तरी उपाध्यक्षपदावर आपली छाप उमटवण्याची संधी भाजप साधेल, असा अंदाज आहे.