लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांना मात्र चार हजार रुपयांच्या आसपास दर मिळाल्याने त्यांचे प्रतिक्विंटल किमान एक हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.
सन २०२४-२५ या विपणन हंगामासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ४,८९२ रुपये जाहीर केली होती. वास्तवात, शेतकऱ्यांना ३,८०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विकावे लागले. हा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा किमान एक हजार रुपये कमी दराने विकावे लागले. महाराष्ट्रात ५० लाख हेक्टरमध्ये म्हणजेच १ कोटी २५ लाख एकरमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. एकरी सरासरी चार क्विंटल उत्पादन ग्राह्य धरल्यास राज्यात पाच कोटी क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होते. सोयाबीनला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.
इतर शेतमालाचे दर एमएसपीपेक्षा खाली
- केंद्र सरकारने कापसाची एमएसपी ७,५२० रुपये, तूर ७,५५० रुपये आणि हरभऱ्याची एमएसपी प्रतिक्विंटल ५,६५० रुपये जाहीर केली आहे.
- सोयाबीनसोबत हे तिन्ही शेतमाल शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने विकावे लागत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.