'एम्समध्ये मोठे संबंध आहेत, सहज नोकरी मिळवून देऊ शकतो' वृद्ध जोडप्याने अनेकांना आमिष दाखवून फसवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:54 IST2025-11-14T15:53:02+5:302025-11-14T15:54:29+5:30
Nagpur : 'एम्स'मध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका वृद्ध जोडप्याने कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

'We has great connections in AIIMS, can easily get you a job' Elderly couple lures many people and deceives them
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'एम्स'मध्ये नोकरी देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका वृद्ध जोडप्याने कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमराव गणवीर (वय ७०), पत्नी आशा गणवीर (६५), मुलगी समता गणवीर (४०), संघर्ष गणवीर (४५) आणि अरुण गवळी ऊर्फ प्रिन्स ऊर्फ आदर्श भीमराव गणवीर (४३, रनाळा, महावीर नगर) अशी आरोपींची नावे आहेत. तेलंगखेडी येथील रहिवासी मनीषा राजू खंडाते या समता गणवीरला अनेक वर्षांपासून ओळखतात. प्रिन्सचे एम्समध्ये मोठे संबंध आहेत व तिला तो सहज स्टोअरकीपरची नोकरी मिळवून देऊ शकतो, असे आमिष समताने मनीषाला दाखवले.
त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनादेखील नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आरोपींनी त्यांच्या मैत्रिणी दुर्गा बावणे यांच्याकडून १.४० लाख आणि प्रीती बिनकरकडून १.५५ लाख असे ३.७५ लाख रुपये घेतले. मे महिन्यापासून आरोपी लोकांना नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवत होते. त्यांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी त्यांना शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. मनीषाने अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.