आम्ही कुणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:51 IST2024-08-29T17:51:26+5:302024-08-29T17:51:56+5:30
Nagpur : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट

We are not projecting anyone for the post of Chief Minister
नागपूर : महाविकास आघाडी एकत्र म्हणून निवडणूक लढणार आहे. जागावाटपबाबत दोनदा चर्चा झालेल्या आहेत. लवकरच पुन्हा एक बैठक होईल. मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतर एकत्रितपणे ठरवू. आम्ही कोणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी नागपुरात आले असला चेन्नीथला पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमच्यात कुठलेही मतभेद नाही. सर्वांना घेऊन चालू, आघाडी धर्म पाळू. महाराष्ट्र ही काँग्रेसचे भूमी आहे. त्यामुळे जास्त जागा लढण्यासाठी मागू, असा युक्तिवादही त्यांनी केला. अजित पवार यांनी भलेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात माफी मागितली असेल, मात्र महाराष्ट्रची प्रतिमा डागाळली. पुतळा कोणी बनवला, त्याचा पक्षाशी काय संबंध आहे, ही दुर्घटना कशी झाली, असे प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्राचा जो अपमान झाला त्यावर केवळ माफी मागून होणार नाही, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. पुतळा पडला, जनतेचा पैसा गेला. देवेंद्र फडणवीस यांनी हे कोणी केले ते पाहून त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
बदलापूरच्या घटनेवर राष्ट्रपतींनी व्यक्त व्हावे
कोलकाता सोबतच महाराष्ट्राच्या बदलापूर येथील घटनेवरही राष्ट्रपतींनी व्यक्त व्हायला पाहिजे. राष्ट्रपती या देशाच्या आहेत, केवळ कोलकाताच्या नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीही बघायला पाहिजे, अशा शब्दात चेन्नीथला यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रत्येक पक्ष आपापले बोलतो : बाळासाहेब थोरात
उद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत हे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करीत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रत्येक पक्ष आपापले बोलत असतो. आमचे कार्यकर्ते आमचे कोणाचे नाव घेत असतील तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. मविआच्या दोन बैठका झाल्या आहेत. जागा वाटपाचा प्रश्न लवकरच सोडवू, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे काम सुरू आहे. महायुती सरकार घाबरले आहे. सरकारी खर्चाने प्रचार चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला.