अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:54 IST2025-10-27T17:52:27+5:302025-10-27T17:54:17+5:30
NCP Viral Video: वाजले की बारा लावणीवर एक महिला नाचतेय. ज्या ठिकाणी ही महिला नाचत आहे, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच नागपुरातील मुख्य कार्यालय आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओची स्टोरी काय आहे?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
एक महिला वाजले की बारा या लावणीवर नृत्य करत आहेत. काही लोक खुर्च्यांवर बसलेले आहेत. पाठीमागे पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे फोटो आहेत, ज्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे फोटो दिसत आहेत. पण, पक्षाच्या कार्यालयातच लावणी नृत्य करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि थेट खासदार सुनेत्रा पवारांनी शहराध्यक्षांना कॉल केला. नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात नक्की काय घडलं?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. व्हिडीओ एक महिला लावणी नृत्य करत असल्याचा आहे. नागपूरमधील अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य कार्यालय आहे, तिथलाच हा व्हिडीओ आहे.
महिलेचा लावणी नृत्य करतानाचा व्हिडीओ बघा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा'वर महिलेचा तुफान डान्स, कार्यकर्त्यांना सुनेत्रा पवारांचा फोन; नेमकं काय घडलं? pic.twitter.com/7dbpT8HiwK
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) October 27, 2025
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागपूरमधील मुख्य कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमातील हा लावणी नृत्य करतानाचा व्हिडीओ आहे.
नृत्य करणारी महिला कोण?
लावणी सादर करणाऱ्या महिलेचे नाव शिल्पा शाहीर आहे. त्या मैत्रिणीसोबत या कार्यक्रमाला गेल्या होत्या. दिवाळी मिलन आणि सत्कार कार्यक्रम आहे, असे निमंत्रण त्यांना देण्यात आले होते. लावणी नृत्य येत असल्याने त्यांना सादरीकरण करण्याची विनंती केली गेली होती.
सुनेत्रा पवारांचा कॉल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी काय सांगितलं?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. खासदार सुनेत्रा पवार यांनी कॉल केला होता. त्यांना माहिती दिली आहे. लावणी सादर करण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या कलाकरांना बोलवले गेले नव्हते. पक्षातील कार्यकर्ते दिवाळी मिलनच्या निमित्ताने एकत्र आले होते आणि आपापली कला सादर करत होते, असे अहिरकर यांनी म्हटले आहे.