Vidarbha Rains : पुढचे सहा दिवस विदर्भातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका ! दसऱ्यापर्यंत पावसाचा रोख कसा बदलणार?
By निशांत वानखेडे | Updated: September 26, 2025 20:41 IST2025-09-26T20:39:13+5:302025-09-26T20:41:56+5:30
विदर्भात मध्यम, महाराष्ट्रात जोरदार शक्यता : शुक्रवारी दिवसभर ताप, सायंकाळी आल्या सरी

'These' districts of Vidarbha to receive heavy rains for the next six days! How will the rainfall pattern change by Dussehra?
नागपूर : चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या लाेकांना हैराण करणारा पाऊस आणखी म्हणजे दसऱ्यापर्यंत पिच्छा साेडणार नाही, अशी स्थिती आहे. पुढचे सहा दिवस विदर्भात मध्यम, तर उर्वरित महाराष्ट्रात जाेरदार ते अतिजाेरदार पाऊस हाेईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नद्यांच्या परिसरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण हाेईल, अशी भीती आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिराेलीत जाेरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून २७ राेजी सकाळपर्यन्त हवेच्या तीव्र कमी दाबात रूपांतरीत हाेण्याची शक्यता आहे. ही स्थिती चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारपासुन दसऱ्यापर्यंतच्या ६ दिवसात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भाच्या नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया, भंडारा व पश्चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात मध्यम ते जाेरदार पाऊस हाेईल, असा अंदाज आहे. त्यानंतर पुढचे पाच दिवस २ ऑक्टाेबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस हाेत राहिल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३ ऑक्टाेबरनंतरच बऱ्यापैकी उघडीप मिळण्याचा अंदाज आहे.
शुक्रवारी दिवसभर ताप, सायंकाळी गारवा
दरम्यान गुरुवारी सायंकाळ पासून नागपूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपात १२.५ मि.मी. पाऊस झाला. शुक्रवारी मात्र उन्हाची तीव्रता वाढली हाेती. त्यामुळे कमाल तापमान २.९ अंशाने वाढून पुन्हा ३४.२ अंशावर गेले. त्यामुळे दिवसभर उकाड्याचा त्रास झाला. सायंकाळी मात्र हलक्या सरी बरसल्या. ५ मि.मी. पावसाची नाेंद झाली. दुसरीकडे विदर्भात चंद्रपूरला रात्री मुसळधार (५९ मि.मी.), तर गडचिराेली (२९.२ मि.मी.), गाेंदिया (३४.५ मि.मी.), भंडारा (२२ मि.मी.) जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. या चारही जिल्ह्यात शुक्रवारी मात्र तुरळक सरी बरसल्या. मात्र तापमान बरेच वाढले हाेते. चंद्रपूर ६ अंशाने वाढून ३४.८ अंशावर पाेहचले. वर्धा ४.८ अंशाने वाढून ३३.८ अंशावर गेले. गाेंदिया, भंडारा, गडचिराेलीतही २ पेक्षा अधिक अंशाची वाढ झाली.