Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:18 IST2025-07-09T11:15:34+5:302025-07-09T11:18:02+5:30
Maharashtra Rain: विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाने चांगलाच तडाखा दिला. नागपूरमधील काही भागात घरांमध्ये पाणी शिरले असून, काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
Vidarbha Flood News: नागपूरसहविदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. नागपूर, वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यांच्यासाठी मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असून, शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्यात पावसाने जोर धरला असून, मंगळवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. उपराजधानी नागपूरमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. काही ठिकाणी घरात आणि रेल्वे स्थानकातही पाणी शिरले.
नरसाळा स्मशानभूमि परिसरात पाणी भरले असून, पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे अनेक नागरिक अडकले. त्यांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. सक्करदरा सोमवार पेठ परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.
कळमना आणि दत्तात्रय नगर भागातही मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे. या भागातील पाणी उपसण्याचे काम सुरू करण्याच आले आहे. मागील तीन दिवसांपासून नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला असून, अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक रस्ते पाण्याखाली नागपूर जिल्ह्यातील शाळांना सु्ट्टी
नागपूर जिल्ह्यात ९ जुलै रोजीही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी देण्यात आली आहे.
नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाने चांगलाच तडाखा दिला. नागपूरमधील काही भागात घरांमध्ये पाणी शिरले असून, काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरमधील काही दृश्य...#Nagpur#nagpurrains#MaharashtraNewspic.twitter.com/HfYiPf7ZHH
— Lokmat (@lokmat) July 9, 2025
नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक तालुक्यातील रस्त्यांना पुराचा फटका बसला आहे, अशी माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. हिंगणघाट, देवळी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
वर्धा जिल्ह्यातही पूर परिस्थिती
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात अतिमुसळधार पाऊस झाला आहे. बुधवारीही या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदियाचा मध्य प्रदेशशी संपर्क तुटला आहे.
वर्धा जिल्ह्यात नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यशोदा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली असून, पुलावरून तीन फूट फाणी वाहत आहे. अलमडोह ते अल्लीपूर हा मार्ग त्यामुळे बंद झाला आहे.
वर्धा ते राळेगाव हा मार्गही पुरामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणचा संपर्क तुटला आहे. वर्धा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्लासेसना सुट्टी देण्यात आली आहे.