उत्तरेकडील गार वाऱ्याने विदर्भ गारठला ! आठवडा ठरला यंदाचा सर्वांत थंड; जानेवारीत तापमानाचा काय अंदाज ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:49 IST2025-12-30T19:47:40+5:302025-12-30T19:49:00+5:30
Nagpur : काश्मिरात ४० दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा कालावधी म्हणजेच 'चिलाई कलान'ला २१ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या नैसर्गिक बदलाचा थेट परिणाम म्हणजे उत्तर भारतातून गार वारे वाहून महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे.

Vidarbha gets cold winds from the north! This week has been the coldest this year; What is the temperature forecast for January?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काश्मिरात ४० दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा कालावधी म्हणजेच 'चिलाई कलान'ला २१ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या नैसर्गिक बदलाचा थेट परिणाम म्हणजे उत्तर भारतातून गार वारे वाहून महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. तसे यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात सर्वाधिक थंड दिवसाची नोंद करण्यात आली.
पहिल्या आठवड्यापासून थंडीचा प्रकोप वाढला आहे. दुसरा व चौथा आठवडा तर प्रचंड थंडीचा ठरला. विशेष म्हणजे येत्या जानेवारीमध्येही तापमान सरासरीच्या खाली राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
काश्मीर, उत्तरेकडील गार वाऱ्याने शहरही गारठले
सध्या काश्मिरसह उत्तर भारतामध्ये जबरदस्त थंड लाटेची स्थिती आहे. काश्मिरमध्ये तापमान मायनसवर असून पंजाबची काही शहरे सतत ५ अंशांच्या खाली आहेत. उत्तर व पूर्वोत्तर राज्यात धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याने विदर्भाची शहरे गारठली आहेत, ज्यामध्ये नागपूरचाही समावेश आहे.
हा आठवडा ठरला यंदाचा सर्वांत गार
डिसेंबरचा दुसरा व चौथा आठवडा सर्वाधिक थंडीचा ठरला. त्यातही दुसऱ्या आठवड्यात १० डिसेंबर रोजी मोसमातील सर्वांत कमी ८ अंश तापमानाची नोंद झाली. या आठवड्यात ७ रोजी ८.५ अंश, ८ रोजी ९.६ अंश, ९ रोजी ८.८ अंश, १० ला ८ अंश, ११۹ रोजी ८.१ अंश आणि १२ व १३ रोजी १० अंश किमान तापमानाची नोंद झाली.
यंदाचा १० डिसेंबरला वर्षातील नीचांकी तापमान
यंदा १० डिसेंबरला सर्वांत कमी ८ अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र, यापूर्वी २०१८ साली २९ डिसेंबरला रात्रीचा पारा ३.५ अंशांवर गेला होता, जो शतकातील थंडीचा विक्रम आहे. २०२१ व २०२४ या वर्षातही यंदापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.
नववर्षाचे स्वागत गारठ्याने होणार
उत्तरेकडे वाढलेली थंडी पाहता सध्यातरी गारठ्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पुढचे काही दिवस किमान तापमान १० अंशांच्या खाली-वर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत गारठ्यानेच करावे लागेल, असा अंदाज आहे.
थंड वाऱ्यांमुळे सर्दी-तापाने शहर बेजार : डिसेंबर महिन्यात सातत्याने तापमान सरासरीच्या खाली राहिले आहे. त्यातही उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. घरोघरी सर्दी, ताप आणि खोकल्याचेही रुग्ण वाढले आहेत.
गहू, हरभरा पिकांना फायदा : सध्या आकाश निरभ्र आहे, ढगाळ वातावरण नाही. याचा लाभ शेतातील पिकांना होत असतो. शेतक-यांच्या शेतात गहू, हरभरा आहे.
जानेवारीत तापमानाचा काय अंदाज ?
डिसेंबरला कडाक्याची थंडी सहन केल्यानंतर जानेवारीमध्ये हळूहळू पारा वाढून नागपूरकरांना गारठ्यापासून दिलासा मिळतो. यंदा मात्र कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या खाली राहणार आहे. त्यामुळे गारठ्याचा त्रास कमी-अधिक प्रमाणात कायम राहणार, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.
आठवड्यातील तापमान
तारीख किमान कमाल
रविवार २१ ८.६ २८.६
सोमवार २२ ८.२ २८
मंगळवार २३ ९.२ २८.३
बुधवार २४ ९.६ २९.२
गुरुवार २५ १०.६ २८.८
शुक्रवार २६ ११.२ २८
शनिवार २७ १०.६ २७.८
"नागपूरला २०१८ साली पडलेल्या थंडीचा विक्रम अबाधित आहे. यंदा आतापर्यंत ८ अंश नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, यंदा अनेक वर्षांनंतर थंडीच्या दिवसांची संख्या अधिक होती. सर्व दिवस तापमान सरासरी खाली होते व दोन आठवडे थंड लाटसदृश्य स्थिती होती. पुढचे दोन महिने, म्हणजे फेब्रुवारीपर्यंत पारा सरासरीच्या खाली राहून थंडी जाणवत राहील, अशी शक्यता आहे."
- डॉ. रिझवान अहमद, हवामान अधिकारी, प्रादेशिक हवामान विभाग