नागपूरमध्ये अर्बन हाट केंद्राची होणार निर्मिती अन् दोन नवीन उड्डाणपुलांचे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:01 IST2025-03-11T18:00:40+5:302025-03-11T18:01:14+5:30

राज्याच्या अर्थसंकल्पात नागपूरसह जिल्ह्यासाठी गुड न्यूज : कोंडी दूर होणार

Urban Haat Center to be built in Nagpur and two new flyovers to be gifted | नागपूरमध्ये अर्बन हाट केंद्राची होणार निर्मिती अन् दोन नवीन उड्डाणपुलांचे गिफ्ट

Urban Haat Center to be built in Nagpur and two new flyovers to be gifted

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्य सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नागपूरची विशेष काळजी घेण्यात आली आहे. हातमागांना प्रोत्साहन देण्यासाठी 'अर्बन हाट केंद्र' प्रस्तावित करण्यात आले आहे. यासोबतच शहरात दोन नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.


हातमाग विणकरांना प्रशिक्षण देण्यासाठी शहरात सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये आधीच सेवा आणि प्रशिक्षण केंद्र आहे. येथे प्रशिक्षणार्थीना हातमागाशी संबंधित सर्व माहिती दिली जाते. यशस्वी आधुनिक हातमाग प्रशिक्षणार्थीना ९० टक्के अनुदानावर ३ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक यंत्रे दिली जातात. या मशीनद्वारे चांगल्या दर्जाचे हातमागाचे कपडे तयार करता येतात. प्रशिक्षणार्थीना विपणनासाठीही आर्थिक मदत दिली जाते.


बाजारपेठ उपलब्ध होणार
आता त्यांना आणि इतर हातमाग उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अर्बन हाटची स्थापना केली जाईल. यासोबतच अर्थसंकल्पात तरतूद करून शहरात आणखी दोन प्रस्तावित उड्डाणपूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अंतर्गत १२४ कोटी ८७लाख रुपयांचा मनीष नगर ते हॉटेल रॅडिसन ब्ल्यू असा रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. तसेच मानेवाडा उडाणपूल ते म्हाळगी नगर उड्डाणपूल जोडण्यासाठी रिंगरोडवर उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. यासाठी १८४ कोटी ५४ लाख रुपये खर्च होईल.


काटोल येथे नवीन न्यायालयाची निर्मिती
राज्य सरकारने १८ नवीन न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील काटोल येथेही न्यायालय प्रस्तावित आहे. दर्यापूर-अमरावती, पौड, इंदापूर आणि जुन्नर- पुणे, पैठण आणि गंगापूर-छत्रपती संभाजीनगर, आर्ची-वर्धा, वणी-यवतमाळ, तुळजापूर-धाराशिव आणि हिंगोली येथेही न्यायालये प्रस्तावित आहेत.


देशी गायींचे संगोपन, संवर्धन
देशी गायींचे संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गौ-विज्ञान अनुसंधान केंद्रास साहाय्य करण्यात येणार आहे


रामटेकमध्ये दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव
प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून तेथे दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. 


विमानतळ अत्याधुनिक होणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खासगी सहभागातून अत्याधुनिक करण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. प्रवासी आणि वाहतूक क्षमता वाढवली जाईल. त्यामुळे विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.


मेट्रो रेल्वेचा ६,७०८ कोटींचा दुसरा टप्पा
नागपूरसह मुंबई आणि पुण्यात १४३.५७ किमीचा मेट्रो रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला आहे. नागपूर मेट्रो रेल्वेचा ४० किमी लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात ६७०८ कोटी रुपये किमतीचे ४३.८० किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. 

Web Title: Urban Haat Center to be built in Nagpur and two new flyovers to be gifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.