बिहारच्या इतिहासात कधीही न मिळालेलं बहुमत ! रालोआच्या विजयानंतर २०४७ पर्यंत सत्तेत राहण्याचा बावनकुळेंचा दावा
By योगेश पांडे | Updated: November 14, 2025 15:13 IST2025-11-14T15:10:59+5:302025-11-14T15:13:04+5:30
Nagpur : निकालांचा कल दिसताच राहुल बाबा विदेशात गेले. आम्ही ४० वर्षे विरोधी पक्षात होतो, कधीही ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवातून शिकून पुढे गेलो. पण काँग्रेस चिंतन न करता विदेशात पळते.

Unprecedented majority in Bihar's history! Bawankule claims to remain in power till 2047 after NLA's victory
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिहारमध्ये रालोआला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. २०४७ पर्यंत देश व राज्यात रालोआच सत्तेवर राहील असा त्यांनी दावा केला आहे.
६५ वर्षे लोकांनी काँग्रेसला जात-धर्माच्या आधारावर मतदान केले. मात्र भाजपने विकासाचा अजेंडा दिला आणि देश आज विकासाच्या मार्गावर ठामपणे चालला आहे. २०४७ पर्यंत केंद्र आणि राज्यात रालोआच सत्तेत राहील, यात शंका नाही. बिहारच्या निकालामुळे रालोआला आणखी मजबूती मिळाली आहे. देशभरात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होईल आणि जनता विकासाला प्राधान्य देत पुढील निवडणुकांतही रालोआलाच पाठिंबा देईल असेही बावनकुळे म्हणाले.
बिहारमधील अभूतपूर्व विजय हा देशाच्या राजकीय परिवर्तनाचे प्रतिक आहे. बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विकासाच्या ध्येयाला पसंती दिली आहे. बिहारच्या इतिहासात कधीही न मिळालेलं इतकं मोठे बहुमत रालोआला मिळालले आहे. जनता विकास, विश्वास आणि विकसित भारताच्या संकल्पनेसोबत उभी राहिली. या विजयाने देशभरातील सामान्य मतदाराचा विकासाकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
काँग्रेस दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे आणि राहुल गांधींचे नेतृत्व हतबल झाले आहे. काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही. समाजात तेढ निर्माण करणे हा त्यांचा एकमेव हेतू दिसतो. २०२९ मध्ये काँग्रेस देशातील सर्वात छोटी पार्टी बनेल, असा चिमटा त्यांनी काढला.
निकालांचा कल दिसताच राहुल बाबा विदेशात गेले. आम्ही ४० वर्षे विरोधी पक्षात होतो, कधीही ईव्हीएमला दोष दिला नाही. पराभवातून शिकून पुढे गेलो. पण काँग्रेस चिंतन न करता विदेशात पळते. हीच त्यांची पारंपरिक सवय झाली आहे. विरोधकांकडे कोणताही रोडमॅप नव्हता, असेदेखील त्यांनी सांगितले.