उद्धव सेनेचा काँग्रेसला ३० जागांचा प्रस्ताव, स्वबळासाठी मुलाखतीही सुरू
By कमलेश वानखेडे | Updated: December 19, 2025 18:54 IST2025-12-19T18:49:24+5:302025-12-19T18:54:39+5:30
Nagpur : जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे आणि राज्य संघटक सागर डबरासे यांच्या समक्ष सुमारे ६० इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली.

Uddhav Sena proposes 30 seats to Congress, interviews for self-reliance also begin
कमलेश वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी पुढाकार घेत उद्धव सेनेने काँग्रेसला ३० जागांची मागणी करणारा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय काँग्रेसशी आघाडी न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू केल्या आहेत.
उद्धव सेनेचे नागपूर शहर जिल्हाप्रमुख
प्रमोद मानमोडे यांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांची भेट घेत आघाडी करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेली मते विचारात घेता किमान ३० जागा सोडाव्या, असा प्रस्ताव मानमोडे यांनी आ. ठाकरे यांना दिला. अनेक प्रभागात उद्धव सेनेची काँग्रेसला मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. चर्चेत दोन्ही पक्षांनी अपेक्षित जागांची यादी तयार करावी व पुढील बैठकीत त्यावर चर्चा करू, असे ठरले. यानंतर उद्धव सेनेने शुक्रवारी निर्मल गंगा अपार्टमेंट नंदनवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे आणि राज्य संघटक सागर डबरासे यांच्या समक्ष सुमारे ६० इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. इतर पक्षातील कार्यकर्त्यांही मुलाखत दिल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. सन्मान जनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर पूर्ण ताकतीनीशी निवडणूक लढवू, असे मानमोडे यांनी मुलाखती दरम्यान स्पष्ट करीत इच्छुक उमेदवारांना तयारी सुरू ठेवण्याचा सूचना केल्या.