The truck crushed the three, causing a horrific accident around midnight | भरधाव ट्रकने तिघांना चिरडले, मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात

भरधाव ट्रकने तिघांना चिरडले, मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात

कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील कोंढाळी नजीकच्या सबा ढाब्यावर जेवायला जाणाºया तिघांना ट्रकने चिरडले. यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ट्रक चालक शेख अन्नू (२०) रा. शिवनी अकोला, जावेद खान (२८) रा. खदान अकोला, शेख परवेज (३५) रा. नांदेड (हल्ली मु. वाशिम बायपास अबिंका नगर,अकोला) यांचा मृत्यू झाला. यात एक चालक फिरोज खान (४५) जखमी झाला असून ट्रकचा क्लिनर सोहेल खान (१८) रा.वाशिम बायपास, अकोला हा बचावला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथून ट्रक क्रमांक एम. एच. ३० - ए.बी १२७९ व ट्रक क्रमांक एम.एच. 30 ए.बी. ३८६१ हे दोन ट्रक तांदूळ भरुन तिवसा (जि.अमरावती) कडे जात होते. या ट्रकच्या चालकांनी रात्री १२ वाजताच्या सुमारास कोंढाळी नजीकच्या सबा ढाब्या समोर ट्रक थांबविले. ढाब्यावर जेवन करण्याकरीता मार्ग ओलांडून जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने धडक देत तिघांना चिरडले. धडक देणारा ट्रक अमरावतीकडे फरार झाला. घटनेची माहिती होताच कोंढाळी आणि महामार्ग पोलीस तिथे दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही मृताची ओळख पटवून मृतदेह काटोल येथील शासकीय  रुग्णालयात उत्तरीय चाचणीसाठी रवाना केले. जखमी चालकाला तातडीने नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: The truck crushed the three, causing a horrific accident around midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.