रेल्वेमधून प्रतिबंधित चिजवस्तूंची वाहतूक ; स्थानकावर सुतळी बॉम्बसह फटाक्यांचा साठा जप्त
By नरेश डोंगरे | Updated: October 20, 2025 20:29 IST2025-10-20T20:29:15+5:302025-10-20T20:29:57+5:30
सलग कारवाई तरीही अनेकांचा निर्ढावलेपणा : गोंदिया, बालाघाटमधील ६ आरोपी गजाआड

Transportation of prohibited items by train; Stock of firecrackers including twine bombs seized at the station
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती होत असताना आणि रेल्वे पोलिस तसेच सुरक्षा दलाकडून सलग कारवाई होत असतानादेखील अनेक जण रेल्वे गाड्यांमधून फटाक्यांसह अन्य धोकादायक चिजवस्तूंची वाहतूक करीत आहेत. गेल्या दोन दिवसांत अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर, आठवडाभरात कारवाई करण्यात आलेल्यांची संख्या सात झाली आहे.
रेल्वे गाड्यांमधून अतिज्वलनशील फटाके तसेच अन्य प्रतिबंधित चिजवस्तूंची वाहतूक केली जात असल्याचे 'लोकमत'ने ८ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे सुरक्षा (आरपीएफ) आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी त्याची गंभीर दखल घेतली. कडक कारवाईसाठी विविध ठिकाणी विशेष पथकांची नियुक्ती केल्यानंतर १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान गॅस सिलिंडर तसेच फटाक्यांसह तीन आरोपींना पकडण्यात आले. त्यांच्यावर कारवाई झाल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही अनेकांनी ही धोकादायक कृती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे आरपीएफने १८ ऑक्टोबरला गोंदियाला विशाल विनायक धाडे (रा. डुडा पारधी, डुग्गीपार) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २०० सुतळी बॉम्ब जप्त केले.
१९ ऑक्टोबरला इतवारी रेल्वे स्थानकावर चार वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. पहिली कारवाई संतोष महिपाल राऊत (रा. पांंडरवानी, बालाघाट, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध करण्यात आली. संतोषला सिलिंडरसह ताब्यात घेण्यात आले. तर, १९ आणि २० ऑक्टोबरलाच इतवारी रेल्वे स्थानकावर फरिद खान साबिर खान (वय ३०, रा. गाैतम नगर गोंदिया), संजय महेश रहांगडाले (रा. करियाडन, बालाघाट) आणि फरदीन गनी खान (रा. गांधीबाग नागपूर) या तिघांविरुद्ध करण्यात आली. त्यांच्याकडून अनुक्रमे ५,२६०, २४०० आणि ८०३६ असे एकूण १५ हजार, ६९९ रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले.
रायपूर-इतवारी लोकल ट्रेनमध्ये साठा जप्त
प्रचंड धोकादायक असल्याची माहिती असूनही जरीपटक्यातील रोशन चंद्रप्रकाश बृजवानी नामक आरोपी चक्क रेल्वे गाडीतून फटाके घेऊन येताना पकडला गेला. इतवारी रेल्वे स्थानकावरच्या आरपीएफ पथकाने रायपूर इतवारी ट्रेनमध्ये तपासणी करताना आरोपी रोशन बृजवानी वेगवेगळ्या बॉक्समधून ३६ हजार ५५२ रुपयांचे फटाके वाहून नेताना आढळला. त्याला अटक करून त्याच्याकडून हा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला. या सर्व कारवाया रेल्वे ॲक्टच्या कलम १६४ अन्वये करण्यात आल्या.