गुणपत्रिकांमध्येही घोळ; विद्यापीठाच्या ७० टक्के परीक्षांचे निकाल रखडले, सिनेटमध्ये संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:52 IST2026-03-14T16:51:40+5:302026-03-14T16:52:24+5:30
Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शुक्रवारी झालेली अर्थसंकल्पीय सिनेट बैठक विविध परीक्षांच्या निकालावरून चांगलीच गाजली. हिवाळी सत्रातील परीक्षांच्या निकालांमध्ये होत असलेला विलंब आणि गुणपत्रिकांमधील गंभीर त्रुटी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

There is also confusion in the mark sheets; 70 percent of the university's exam results are delayed, anger in the Senate
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शुक्रवारी झालेली अर्थसंकल्पीय सिनेट बैठक विविध परीक्षांच्या निकालावरून चांगलीच गाजली. हिवाळी सत्रातील परीक्षांच्या निकालांमध्ये होत असलेला विलंब आणि गुणपत्रिकांमधील गंभीर त्रुटी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जवळपास ७० टक्के परीक्षांचे निकाल प्रलंबित असताना परीक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीवर कारवाई का होत नाही, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.
कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या सिनेट बैठकीत सदस्य अॅड. मनमोहन बाजपेयी आणि विष्णू चांगदे यांनी निकाल जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित केला. हिवाळी सत्रात एकूण ११९३ परीक्षा घेण्यात आल्या होत्या; आतापर्यंत त्यातील केवळ ३५२ परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून ८४१ निकाल अद्याप प्रलंबित आहेत. सुमारे ७० टक्के निकाल रखडल्यामुळे सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. या विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश आणि शैक्षणिक नियोजनावर परिणाम होत आहे.
अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचेही समोर आले. जाहीर झालेल्या काही गुणपत्रिकांमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे एनरोलमेंट क्रमांकच नमूद नाहीत. तसेच लेखी परीक्षा आधी आणि प्रात्यक्षिक परीक्षा नंतर झाल्यामुळे अनेक गुणपत्रिकांमध्ये प्रात्यक्षिकाचे गुण नोंदलेले नसून त्यामुळे निकाल अपूर्ण दिसत आहेत. निकाल प्रक्रियेसाठी नियुक्त सॉफ्टवेअर एजन्सीच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करत कंपनीची चौकशी करून करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
सिनेट सदस्य डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांनी विद्यापीठाच्या विविध विभागांच्या निकालांमध्येही चुका असल्याचे निदर्शनास आणले. त्यांनी सांगितले की, परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आयकार्ड आणि रोल नंबर देणे आवश्यक असते; मात्र अनेक विद्यार्थ्यांना आयकार्डच मिळाले नाही. त्यामुळे त्यांना आयकार्डशिवायच परीक्षा द्यावी लागली.
विद्यापीठाकडे डेटा उपलब्ध नाही
कुलगुरू यांनी सांगितले, विद्यापीठाने पूर्वीच्या 'प्रोमार्क' कंपनीकडून विद्यार्थ्यांचा आवश्यक डेटा घेतला नाही, ही मोठी चूक ठरली. नंतर नवीन कंपनीला काम देण्यात आले; परंतु वेळमर्यादा आणि वारंवार सूचना देऊनही ती वेळेत निकाल जाहीर करू शकली नाही. विद्यापीठाकडे डिव्हिजनल आणि रिव्हॅल्युएशनचा डेटा उपलब्ध नसल्यानेच निकालास विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतःची विद्यापीठाची यंत्रणा विकसित केली जाईल : कुलगुरू
नवीन कंपनीकडे परीक्षा प्रक्रियेचे काम दिल्यामुळे परीक्षा व निकालास सतत विलंब होतो. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. विद्यापीठ केवळ बाह्य कंपन्यांवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे विद्यापीठात स्वतंत्र 'समांतर यंत्रणा' विकसित करण्यात येईल. त्यासाठी आयटीतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदतही घेतली जाईल, असे कुलगुरूंनी सांगितले. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वर्षभर लागेल, असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.