लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऐन थंडीच्या काळात विजेची मागणी २५ हजार मेगावॅटच्या पुढे गेली आहे. यातच वीज केंद्रांची गतीही मंदावली आहे. महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रातील तीन युनिट बंद आहेत, तर महाराष्ट्राला वीज पुरवणारे दोन गॅसवर आधारित प्रकल्प ठप्प आहेत. महाजेनकोलाही गॅसचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात विजेचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. महावितरणनेही हे आव्हान स्वीकारत वाढीव मागणी पूर्ण करण्याचे नियोजना सुरू केले आहे. हिवाळ्यात महाराष्ट्रात विजेची सर्वाधिक २० हजार मेगावॅट असते. मात्र यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने पुरेसा पाणीसाठा आहे. शेतकरी आतापर्यंत कृषिपंप वापरत आहेत. अशा स्थितीत विजेच्या मागणीने २५ हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, महाजेनकोच्या चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील युनिट ६ आणि ९ बंद आहेत. तसेच कोराडीतील युनिट क्रमांक ९ देखील तांत्रिक कारणामुळे बंद आहे. दुसरीकडे, एनटीपीसीची कवास आणि गंधार वीज केंद्रे गॅसच्या कमतरतेमुळे ठप्प आहेत.
१६९० मेगावॅट पॉवर एक्स्चेंजमधून मागणी आणि पुरवठा यांच्यात समन्वय साधण्यात महावितरणला मोठी अडचण येत आहे. मंगळवारी त्यांना पॉवर एक्स्चेंजमधून १६९० मेगावॅट वीज घ्यावी लागली. तसेच खासगी क्षेत्रातून ५५४३ मेगावॅट, सौरऊर्जेतून २३१३ मेगावॅट आणि जलविद्युत क्षेत्रातून १४८३ मेगावॅट वीज मिळाली. यावर झालेला खर्च सर्वसामान्य ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्काच्या नावाखाली वसूल केला जाणार आहे.