प्रशिक्षकाच्या 'अमर्याद अधिकारां'बाबतचे सत्य लवकरच समोर येईल; गौतम गंभीरने थरूर यांच्या द्वीटला दिलेल्या उत्तरामुळे वाद ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:23 IST2026-01-23T15:17:15+5:302026-01-23T15:23:07+5:30
Nagpur : 'पंतप्रधानानंतरचे सर्वांत कठीण काम' या शब्दात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेचे वर्णन करताना बुधवारी नागपुरात कौतुक केले.

The truth about the coach's 'unlimited powers' will come out soon; Controversy over Gautam Gambhir's reply to Tharoor's tweet?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'पंतप्रधानानंतरचे सर्वांत कठीण काम' या शब्दात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भूमिकेचे वर्णन करताना बुधवारी नागपुरात कौतुक केले. त्यावर उत्तर गुरुवारी गंभीर यांनी 'आपल्याच लोकांच्या विरोधात उभे केले जात असल्याचे' पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे द्वीट केले. यावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गंभीर यांनी शशी थरूर यांच्या प्रशंसात्मक ट्रीटवर उत्तर देताना प्रशिक्षकाकडे खरोखरच संपूर्ण अधिकार आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. गंभीर यांच्या ट्रीटमध्ये प्रशिक्षकाला 'अनलिमिटेड अॅथॉरिटी' असते ही गोष्ट खरी नाही, असे सूचित करण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की, गंभीर हे निवड समितीशी असहमती दर्शवत आहेत की फक्त टीकाकारांना उत्तर देत आहेत? गंभीर यांनी कोणाचेही नाव घेतले नसल्याने हा वाद अजूनही अस्पष्ट आहे.
नागपुरात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४८ धावांनी विजय मिळवला. मात्र, या विजयापेक्षा जास्त चर्चा संघाचे कोच गौतम गंभीर यांच्या एका ट्रीटची होत आहे. चाहतेही विविध प्रश्न उपस्थित करत आहेत.
क्रिकेटप्रेमी शशी थरूर यांनी नागपूरमध्ये सामन्यापूर्वी गंभीर यांच्यासोबत एक सेल्फी शेअर केली. सातत्याने होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी माजी भारतीय सलामीवीर गंभीर यांचे कौतुक केले. गंभीर यांनी भारतीय संघाची सूत्रे हाती घेतल्यापासून तिन्ही प्रकारांत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
सूर्यकुमार यादव याची भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांचे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणे, असे महत्त्वाचे बदल झाले. याच काळात शुभमन गिल याची कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
थरूर यांचे द्वीट
नागपूरमध्ये माझे जुने मित्र गौतम गंभीर यांच्यासोबत चांगली आणि मनमोकळी चर्चा करण्याचा आनंद घेतला. ते पंतप्रधानानंतर भारतातील सर्वात कठीण जबाबदारी सांभाळत आहेत. दररोज लाखो लोक त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करतात, तरीही ते शांत राहून पूर्ण निर्भयतेने आपले काम करतात. त्यांच्या शांत, दृढनिश्चय आणि सक्षम नेतृत्वाबद्दल कौतुकाचे काही शब्द. आजपासूनच त्यांना सर्व यशासाठी शुभेच्छा.
गौतम गंभीर यांचा प्रतिवाद
गंभीर यांनी उशिरा रात्री प्रतिक्रिया देत त्यांच्या कार्यकाळात चर्चेत राहिलेल्या काही मुद्द्यांचा उल्लेख केला. गंभीर यांनी 'एक्स'वर लिहिले, 'डॉ. शशी थरूर, तुमचे मनापासून आभार. परिस्थिती शांत झाल्यावर प्रशिक्षकाच्या कथित 'अमर्याद अधिकारां'बाबतचे सत्य आणि तर्क स्पष्ट होतील. तोपर्यंत मला स्वतःलाच माझ्याविरुद्ध उभे केलेले पाहून हसू येत आहे.'