चेहऱ्यात बदल झाल्याने सत्र न्यायालयाने सोडले होते निर्दोष; हायकोर्टात दंगलीतील आरोपींना जन्मठेप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:37 IST2025-11-26T13:33:19+5:302025-11-26T13:37:48+5:30
Nagpur : तेव्हापर्यंत घटनेला १२ वर्षे झाली होती. त्यामुळे आरोपींचे वय वाढून चेहऱ्यात बदल झाले होते. परिणामी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना आरोपींची ओळख पटवता आली नाही. त्याचा लाभ आरोपींना मिळाला होता.

The sessions court had acquitted the accused due to facial changes; the High Court sentenced the accused in the riots to life imprisonment!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे ३७वर्षांपूर्वी दोन गटांत दंगल घडल्यानंतर पाच शिवसैनिकांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी (ता. २४) जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांनी हा बहुप्रतिक्षित निर्णय दिला.
अब्दुल अजीज शेख मेहबूब, रफी खान मेहबूब खान व शेख तय्यब शेख मुनाफ, अशी ही शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. ३० सप्टेंबर २००० रोजी अकोला सत्र न्यायालयाने या तिघांसह इतर सर्व आरोपींना ठोस पुरावे नसल्याचे कारण देत निर्दोष मुक्त केले होते.
परिणामी, राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावरील अंतिम सुनावणीदरम्यान सरकारी वकील अॅड. एम. जे. खान यांनी हे तीन आरोपी हत्या व इतर विविध गुन्ह्यांमध्ये दोषी असल्याचे रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर सिद्ध केले. करिता, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून या तीन आरोपींना ही शिक्षा सुनावली तर, इतर आरोपींचे निर्दोषत्व कायम ठेवले.
ही बहुचर्चित दंगल ५ जून १९८८ रोजी घडली होती. त्या दिवशी तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव गावंडे यांच्या हस्ते पंचगव्हाण येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन होणार होते. त्या कार्यक्रमासाठी ट्रॅक्टरने पंचगव्हाण येथे आलेल्या शिवसैनिकांवर दुसऱ्या गटातील आरोपींनी धारदार शस्त्रांसह हल्ला केला. आरोपी नरसीपूर आणि खेलदेशपांडे या दोन गावांदरम्यानच्या विद्रुपा नदीकाठी बंगाली बाभुळबनामध्ये लपून बसले होते. त्यांनी पाथर्डी येथील अवचित कुकडे, श्रीराम गावंडे व दिगंबर गावंडे यांची हत्या केली.
याशिवाय, नेरधामणा येथून छकड्याने आलेल्या काही शिवसैनिकांवर पोहरा नदीजवळ अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला याम नेरधामना येथील श्रीराम भांबेरे ठार झाले होते तसेच, या हल्ल्यात अनेक शिवसैनिक गंभीर जखमी झाले होते.
१४० आरोपींवर गुन्हा दाखल
या समाजविघातक घटनेनंतर पोलिसांनी दुसऱ्या गटातील १३५ ते १४० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तसेच, तपास पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयात सरकारतर्फे अॅड. वाय. डब्ल्यू, देशमुख यांनी बाजू मांडली होती.