संविधानाची मूळ प्रत देशात काही निवडक ठिकाणीच ! नागपूरच्या दीक्षाभूमीलाही तो मान प्राप्त
By आनंद डेकाटे | Updated: November 26, 2025 17:30 IST2025-11-26T17:29:18+5:302025-11-26T17:30:30+5:30
Nagpur : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे जगभरातील देशासाठी प्रेरक मानले जाते. अमलात आणल्यापासून त्यात अनेक सुधारणा झाल्या आहेत व हीच लवचिक विशेषतः त्यात आहे.

The original copy of the Constitution is available only in a few select places in the country! Nagpur's Deeksha Bhoomi also has that honor.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे जगभरातील देशासाठी प्रेरक मानले जाते. अमलात आणल्यापासून त्यात अनेक सुधारणा झाल्या आहेत व हीच लवचिक विशेषतः त्यात आहे. मात्र, त्यावेळी संसदेत अनेक दिवस चर्चा करून तयार झालेली संविधानाची मूळ प्रत देशासाठी महत्त्वाचा दस्तावेज होय. ही दुर्मीळ मूळ प्रत भारतीय संसदेसह देशात काही निवडक ठिकाणीच ठेवली आहे. तो मान नागपूरच्यादीक्षाभूमीलाही मिळाला आहे. बाबासाहेबांचे विश्वासू दादासाहेब गायकवाड यांनी ही प्रत त्यावेळी दीक्षाभूमीला भेट दिली होती, जी आजही येथे संग्रही आहे.
भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी, बाबासाहेबांच्या अनेक आंदोलनात ते सोबत होते. रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली तेव्हा त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांनीच केले होते. रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांनी लोकसभा व राज्यसभा सदस्य म्हणूनही कार्य केले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या स्मारक समितीचे ते पहिले अध्यक्षही होते. त्यांच्याच नेतृत्वात दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान तयार केले. तेव्हा त्याच्या काही मूळ प्रती तयार करण्यात आल्या होत्या. त्यापासून नंतर फोटो कॉपी तयार करून ती सर्व सदस्यांना वितरित करण्यात आली होती. त्यातील एक प्रत दादासाहेब गायकवाड यांनाही मिळाली होती. ती प्रत दादासाहेबांनी दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाला भेट दिली. तेव्हापासून ही प्रत आजही महाविद्यालयाच्या ग्रंथालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.