"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
By नरेश डोंगरे | Updated: May 6, 2025 21:49 IST2025-05-06T21:48:51+5:302025-05-06T21:49:52+5:30
Nagput News: जिवापाड प्रेम करणाऱ्या तरुणीने त्याला बेईमानीचा डंख मारला. तो चिडला, वाद वाढल्यानंतर तिने त्याच्यावर नको ते आरोप लावत विनयभंगाची तक्रार नोंदवली. परिणामी तो खचला अन् त्याने रखरख्यात उन्हात विषप्राशन करून रेल्वे स्थानक परिसरात आपल्या आयुष्याचा अखेर करून घेतला.

"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
- नरेश डोंगरे
नागपूर - जिवापाड प्रेम करणाऱ्या तरुणीने त्याला बेईमानीचा डंख मारला. तो चिडला, वाद वाढल्यानंतर तिने त्याच्यावर नको ते आरोप लावत विनयभंगाची तक्रार नोंदवली. परिणामी तो खचला अन् त्याने रखरख्यात उन्हात विषप्राशन करून रेल्वे स्थानक परिसरात आपल्या आयुष्याचा अखेर करून घेतला. 'बेवफा प्रेयसी'चा बळी ठरलेल्या या तरुणाच्या आत्मघातामुळे त्याच्या कुटुंबियांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. मनाला चटका लावणारी ही घटना मंगळवारी सायंकाळी चर्चेला आली. मृत तरुण वर्धा जिल्ह्यातील आष्टी जवळचा राहणारा आहे.
मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास एक तरुण (वय २४) रेल्वे पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर अचानक पडला. आजुबाजुच्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला पाणी वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी त्याला उन्हाचा तडाखा बसला असावा, असा अंदाज होता. मात्र, त्याच्या तोंडातून फेस तसेच विषासारखा उग्र दर्प येत असल्याने त्याने विष प्राशन केल्याचा संशय बळावला. रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले. उपचार सुरू असताना तेथे सायंकाळी ५ च्या सुमारास त्याने शेवटचा श्वास घेतला.
दरम्यान, या तरुणाजवळ एक स्पोर्ट बॅग होती. त्यात त्याचे कपडे, आधार कार्ड आणि अन्य काही कागदपत्रे होती. त्यावरून त्याचे नाव, पत्ता स्पष्ट झाला. रेल्वे पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती कळविली. हा घटनाक्रम सुरू असताना आणि तो तरुण रेल्वे स्थानक परिसरात खाली पडण्यापासून तो रुग्णालयात नेण्यापर्यंत त्याने बेवफा प्रेयसीबाबत काही बाबी उघड केल्याची चर्चा आहे. तिने त्याच्याशी धोकेबाजी करतानाच शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिल्याचे त्याला माहिती पडले. बेईमान प्रेयसीकडून अशा प्रकारे घात झाल्याने तरुण खचला. पोलिसांकडून कारवाई, कोर्ट-कचेरी तसेच आपली आणि कुटुंबियांची बदनामी होईल, या विचाराने त्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
ती कोण, कुठली ?
रेल्वे पोलिसांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांना माहिती दिली असली तरी वृत्त लिहिस्तोवर ते येथे आले की नाही, ते स्पष्ट झाले नाही. या तरुणाशी विश्वासघात करून त्याला आत्मघात करण्यास बाध्य करणारी ती तरुणी कोण, कुठली ते सुद्धा वृत्त लिहिस्तोवर उघड झाले नव्हते. तपासात या बाबी उघड होतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.