‘भावी मुख्यमंत्री’चा दावा करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याकडून परत बॅनरबाजी, फडणवीसांना ‘महाचाणक्य’ची उपाधी
By योगेश पांडे | Updated: July 3, 2023 13:26 IST2023-07-03T13:16:00+5:302023-07-03T13:26:03+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवी उपाधी, नागपुरात झळकले बॅनर्स

‘भावी मुख्यमंत्री’चा दावा करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याकडून परत बॅनरबाजी, फडणवीसांना ‘महाचाणक्य’ची उपाधी
नागपूर :अजित पवारांसह राष्ट्रवादीचे मोठे नेते सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या राजकीय भूकंपानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कुशलतेमुळेच खिंडार पडले असल्याची कार्यकर्त्यांची भावना असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुरू झाली आहे. काही बॅनर्सवर त्यांचा उल्लेख चक्क ‘महाराष्ट्राचा महाचाणक्य’ असा करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही पदाधिकाऱ्यांनी त्याच ठिकाणी काही आठवड्यांअगोदर फडणवीसांचा भविष्यातील मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता.
बुटीबोरी परिसरात देवेंद्र फडणवीस यांना वेगळी राजकीय उपाधी दिलेलं बॅनर लावण्यात आलं आहे. 'महाराष्ट्राचा महाचाणक्य’ म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा त्यावर उल्लेख करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्राच्या हितासाठी दोन पक्षांना भाजपसोबत आणणाऱ्या देवेंद्रभाऊ तुमच्या चाणक्यनितीला सलाम’ असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या बॅनर्सवर देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो देखील छापण्यात आले असून कमळ, घड्याळ आणि धणुष्यबाण हे तिन्ही पक्षांचे चिन्ह एकत्र दिसून येत आहेत.
फडणवीसांनी टोकल्यावरदेखील अतिउत्साहीपणा
बुटीबोरीतील भाजप पदाधिकारी बबलू गौतम यांनी अनधिकृतपणे हे बॅनर्स लावले आहेत. याच गौतम यांनी एप्रिल महिन्यात फडणवीसांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनर्स लावले होते. यावर फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. ज्या कोणी लावले त्यांनी बॅनर्स काढून टाकावेत. कमीत कमी भाजपमध्ये तरी असा मूर्खपणा कुणी करू नये, अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात, या शब्दांत फडणवीस यांनी खडे बोल सुनावले होते. मात्र त्यानंतरदेखील गौतमची बॅनरबाजीची हौस फिटलेली नाही.