लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाबाजूला नवीन शैक्षणिक धोरण, एआय तंत्रज्ञान व कोट्यवधींच्या साहित्य खरेदीची दावे केले जात आहेत पण दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थी अजूनही जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत, ही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल ५८८ वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत.
जिल्हा परिषदेच्या १५१२ शाळा असून ७२,००० विद्यार्थीशिक्षण घेतात. ५८८ शाळांत पावसाळ्यात पाणी गळती, भिंतींना ओल येणे, छप्पर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाला दुर्घटनेची वाट बघायची आहे का, असा संतप्त सवाल पालक व नागरिक करत आहेत.
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शाळेचे वातावरण आनंददायी असणे गरजेचे आहे. परंतु इमारतीच चांगल्या नसतील तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुर्घटना होण्याचा धोका
शाळेचे छत वा भिंत कोसळून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातीलही परिस्थिती त्याहून वेगळी नाही. अनेक शाळा जुन्या असून जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण शाळांचे छत कोसळून वा भिंत पडून दुर्घटना होण्याचा धोका आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
साहित्य धूळखात पडून
विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी होते, पण ते वापरात येत नाही; काही साहित्य तर धूळखात पडले आहे. मग जीर्ण शाळांची दुरुस्ती करण्यासाठी निधी का नाही, असा थेट सवाल पालक विचारत आहेत.
धोकादायक आकडेवारी
- धोकादायक वर्गखोल्या - ५८८
- आवश्यक नव्या वर्गखोल्या - १९०
- मोठ्या दुरुस्तीची गरज असलेल्या वर्गखोल्या - १०९
- किचन शेड आवश्यक - १०९
- विद्युतीकरण आवश्यक शाळा - १३४
- संरक्षण भिंत नसलेल्या शाळा - ६६३
शॉक लागण्याचा धोका
साध्या इमारती पावसाळ्यात गळक्या आहेत, संरक्षण भिंती नाहीत, अनेक शाळा अजूनही वीजपुरवठा व्यवस्थित नाही. विद्यार्थ्यांना शॉक लागून दुर्घटना होण्याचा धोका कायम आहे. हजारो विद्यार्थी या धोकादायक इमारतींमध्ये शिक्षण घेत आहेत.