'सरकार कुत्री पकडू शकत नाही, बिबटे काय पकडणार?' आमदार जयंत पाटील यांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:45 IST2025-12-12T19:43:03+5:302025-12-12T19:45:24+5:30
Nagpur : राज्यात बिबट्यांच्या हल्ल्याचा विषय गाजत असतानाच, मोकाट कुत्र्यांच्या विषयावरही विधिमंडळ परिसरात चिंता व्यक्त करण्यात आली. गुरुवारी सकाळी विधानभवन परिसरातील श्वानांना पकडण्यासाठी नागपूर महापालिकेची गाडी आली होती.

'The government can't catch dogs, how can it catch leopards?' MLA Jayant Patil's scathing criticism
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात बिबट्यांच्या हल्ल्याचा विषय गाजत असतानाच, मोकाट कुत्र्यांच्या विषयावरही विधिमंडळ परिसरात चिंता व्यक्त करण्यात आली. गुरुवारी सकाळी विधानभवन परिसरातील श्वानांना पकडण्यासाठी नागपूर महापालिकेची गाडी आली होती. परंतु, महापालिकेचे कर्मचारी श्वानांना पकडू शकले नाही.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळ परिसरात सरकारवर खोचक टीका करीत 'जे सरकार कुत्री पकडू शकत नाही, ते बिबट्या काय पकडणार'.
एक कोटी शेळ्या आणणार कुठून ?: म्हात्रे
बिबट पकडण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी एक कोटी शेळ्या जंगलात सोडण्याची घोषणा केली आहे, पण बिबट्यांसाठी एक कोटी शेळ्या आणणार कुठून, असा सवाल भाजपच्या ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला. शेळ्या सोडणे हा तात्पुरता उपाय आहे. मुळात बिबट्याचे वनातील खाद्य साखळी वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या : रवी राणा
बिबट्यावरील उपाय म्हणून बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्यात यावा व तसा प्रस्ताव केंद्रीय वनमंत्र्यांकडे पाठविण्यात यावा, असे प्रतिपादन आमदार रवी राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यास मी स्वतः दोन बिबटे पाळणार आहे, असे राणा म्हणाले. अंबानींनी सुरू केलेल्या वनतारासारखे प्राणिसंग्रहालय प्रत्येक जिल्ह्यात व्हावे, त्यासाठी उद्योगपतींनी पुढे यावे व सरकारने त्यांना परवानगी द्यावी, जेणेकरून मानव-वन्यप्राणी संघर्षावर तोडगा निघेल, असेही रवी राणा म्हणाले.