कधीही शाळेत शिकविण्यासाठी न गेलेल्या महिलेचा शालार्थ आयडी, कागदोपत्री दाखविले शिक्षक
By योगेश पांडे | Updated: February 27, 2026 20:46 IST2026-02-27T20:45:05+5:302026-02-27T20:46:15+5:30
शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एक गुन्हा दाखल : शाळा व्यवस्थापनावर संशयाची सुई

Teacher shows school ID, documents of woman who never went to school to teach
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजवर कधीही शाळेत शिकविण्यासाठी न गेलेल्या महिलेला कागदोपत्री शिक्षक दाखविण्यात आले. तसेच तिचा शालार्थ आयडीदेखील बनविण्यात आला. शालार्थ आयडी प्रकरणातील तपासात हा आणखी एक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्यांची संख्या २७ इतकी झाली आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास राज्यपातळीवरील विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. तपासादरम्यान कान्होलाबारा येथील चित्रलेखादेवी भोसले उच्च प्राथमिक शाळा येथे कागदोपत्री सहायक शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या श्वेता नरेश नगराळेचे (४०) नाव समोर आले. नगराळेने कधीही शाळेत जाऊन शिकविलेले नाही. मात्र मुख्याध्यापक, तत्कालिन शिक्षणाधिकारी, उपसंचालक व वेतन अधीक्षकासोबत संगनमत करून नगराळेचे शालार्थ आयडी तयार करण्यात आले. त्यानंतर वेतन सुरू करण्यात आले. सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नगराळेला वेतनापोटी ५.६५ लाख रुपये देण्यात आले. हा गैरप्रकार समोर आल्यावर नगराळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इतके दिवस एखादी शिक्षिका शाळेत येत नाही व शाळा व्यवस्थापनाकडून काहीच कारवाई होत नाही ही बाबदेखील अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.
अटक झालेल्या आरोपींची संख्या २७
शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची संख्या आता एकूण २७ इतकी झाली आहे. यात तीन शिक्षण उपसंचालक, चार शिक्षणाधिकारी, एक वेतन अधीक्षक, चार मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, चार सहायक शिक्षक, नऊ लिपीकांचा समावेश आहे.