नागपुरात ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:07 IST2021-03-21T04:07:53+5:302021-03-21T04:07:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १५ ते २१ मार्च कालावधीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला ...

Strict restrictions in Nagpur till March 31 | नागपुरात ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध

नागपुरात ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १५ ते २१ मार्च कालावधीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता ३१ मार्चपर्यंत हेच निर्बंध कायम राहणार आहेत. आता सर्व दुकाने दुपारी १ ऐवजी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील तर, रेस्टॉरंटची वेळ सायंकाळी ७ पर्यंत असेल. ऑनलाईन सेवा रात्री ११ पर्यंत सुरू राहील. पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दुपारी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली.

शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर पसरत असण्याच्या काळात हा संसर्ग कमी करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते, व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन राऊत यांनी शहरात ३१ मार्चपर्यंत काही निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या काळात अर्थचक्र रोखले जाणार नाही याची काळजी घेऊ, असेही सांगितले. शहरातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची चाचणी करण्यासाठी त्याचे नमुने दिल्लीत पाठवले आहेत. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली आहे, त्यांनी दिल्लीतून आम्हाला हा अहवाल लवकरात लवकर मिळवून द्यावा. त्यांनी तसे आश्वासन दिले असल्याचे राऊत यांनी सांगितले. नागपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा दोन हजारावरून साडेतीन हजारावर गेला आहे. ही चिंतेची बाब आहे. आम्ही लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी सांगितले.

----------------------

Web Title: Strict restrictions in Nagpur till March 31