'तुला कुणी तरी करणी केली..' भीती दाखवून मांत्रिकाने शिक्षित तरुणाला फसविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 18:57 IST2026-01-08T18:55:48+5:302026-01-08T18:57:44+5:30
Nagpur : 'तुला भूतबाधा झाली आहे, ही बाधा उतरविली नाही तर मोठे संकट येईल', अशी भीती दाखवून एका तरुणास १ लाख ४५ हजार ५०० रुपयांनी गंडविणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकास वेलतूर (ता. कुही) पोलिसांनी अटक केली.

'Someone did something to you..' The sorcerer deceived the educated young man by showing fear
लोकमत न्यूज नेटवर्क
कुही/ वेलतूर : 'तुला भूतबाधा झाली आहे, ही बाधा उतरविली नाही तर मोठे संकट येईल', अशी भीती दाखवून एका तरुणास १ लाख ४५ हजार ५०० रुपयांनी गंडविणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकास वेलतूर (ता. कुही) पोलिसांनी अटक केली.
संदीप गोविंदा वाघमारे (२७) व रवींद्र नंदू वाघमारे (२५) दोघेही रा. पालोरा, ता. पारशिवनी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी भोंदू मांत्रिकांची नावे आहेत. गोविंदा विठ्ठल बावनकर (३१, रा. वेलतूर, ता. कुही) हा सुरत (गुजरात) शहरात नोकरीत करतो. तो सप्टेंबर २०२५ मध्ये काही कामानिमित्त वेलतूर येथे घरी आला होता. दरम्यान, संदीप व रवींद्र २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या काळात अनेकदा गोविंदाच्या घरी आले होते. त्यांनी गोविंदाला विश्वासात घेत ज्याला 'तुला कुणी तरी करणी केली आहे. त्यामुळे तुला भूतबाधा झाली आहे.' अशी बतावणी केली. त्यामुळे तो घाबरला होता.
ही भूतबाधा उतरविण्यासाठी तांत्रिक पूजा करावी लागेल. पूजेसाठी विशिष्ट प्रकारची जडीबुटी खरेदी करून आणावी लागले. त्यासाठी पैशाची गरज भासणार आहे, अशी बतावणी केली. त्या दोघांच्या सांगण्यावर गोविंदाचा विश्वास बसल्याने दोघांनीही त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने १ लाख ४५ हजार ५०० रुपये उकळले. त्यांचा पैसे मागण्याचा प्रकार वाढत चालल्याने यात आपली फसवणूक झाल्याचे काही दिवसांनी गोविंदाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने पोलिस ठाणे गाठून मंगळवारी (दि. ६) तक्रार नोंदविली.
भंडारा जिल्ह्यातून घेतले ताब्यात
वेलतूर पोलिसांनी दोन्ही मांत्रिकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएएनएस) कलम ३१८ (४), ३ (५) तसेच महाराष्ट्र जादूटोणा विरोधी अधिनियम २०१३ च्या कलम ३ (२) अन्वये गुन्हा नोंदवून संदीप वाघमारे व रवींद्र वाघमारे या दोघांचा शोध सुरू केला. दोघेही त्यांच्या मूळगावी पालोरा येथे नसल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे दोघेही नेमके कुठे आहेत, ते शोधून काढले आणि त्यांना लाखनी (जिल्हा भंडारा) येथून शिताफीने ताब्यात घेत अटक केली.
"नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये. जर कोणी जादूटोणा किंवा भूतबाधेच्या नावाखाली पैशांची मागणी करत असेल, तर त्यावर विश्वास न ठेवता तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा."
- प्रशांत मिसाळे, ठाणेदार, वेलतूर, ता. कुही