नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन !

By मोरेश्वर मानापुरे | Published: March 11, 2024 08:17 PM2024-03-11T20:17:04+5:302024-03-11T20:17:14+5:30

- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार

Sitabardi Interchange Station of Metro managed by Nari-Shakti! | नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन !

नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन !

नागपूर: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महामेट्रोच्या नारी शक्तीने एकूण ३७ मेट्रो स्टेशनमध्ये सर्वाधिक वाहतुकीच्या सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे रविवारी नेतृत्व केले आणि यशस्वीरीत्या संचालनही केले. या स्टेशनवर रविवार, १० मार्च रोजी बहुतांश कर्मचारी महिला होत्या. मेट्रोची योग्यरीत्या हाताळणी करून महिला तांत्रिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा प्रत्यय त्यांनी या वर्दळीच्या स्टेशनवर दिला.

सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन व्यावसायिक दृष्टिकोनातून वर्दळीचे असून २७ महिलांच्या सक्षम चमूने स्टेशन व्यवस्थापक, ट्रेन ऑपरेटर, सुरक्षा, तिकीट वितरक, कस्टमर केअर, हाउसकिपिंग आणि अन्य विभाग मजबूतीने सांभाळले. सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाइनचा मध्य आहे, हे विशेष. सर्वात महत्त्वपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मेट्रो स्टेशनचा कार्यभार महिलांनी सहजतेने हाताळला. त्यांच्या या विलक्षण योगदानाबद्दल नारी सशक्त असल्याचा अनुभव सर्वांना पुन्हा आला. ‘महा-मेट्रोचा चेहरा’ असलेल्या या सर्व अद्भुत महिलांचा सर्वांनी आदर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सकाळी ५.३० ते रात्री ११ पर्यंतच्या या महसुली वेळेत सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर सर्वच महिला कर्मचारी तैनात करण्याचा प्रयत्न काही वर्षांपासून सुरू होता. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हा प्रयत्न प्रत्यक्षात उतरला. महामेट्रोतर्फे मेट्रो भवनात महिलांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Sitabardi Interchange Station of Metro managed by Nari-Shakti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.