शालार्थ आयडी घोटाळ्यात महिनाभरात गठीत होणार एसआयटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 14:59 IST2025-07-05T14:56:25+5:302025-07-05T14:59:46+5:30

Nagpur : शिक्षण राज्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा

SIT to be formed within a month in Shalarth ID scam | शालार्थ आयडी घोटाळ्यात महिनाभरात गठीत होणार एसआयटी

SIT to be formed within a month in Shalarth ID scam

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात अद्यापही राज्य शासनाकडून एसआयटीची (विशेष चौकशी समिती) स्थापना झालेली नाही. मात्र, महिनाभरात राज्य शासनाकडून एसआयटी गठित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. विधान परिषदेत आ. संदीप जोशी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता व त्यावर त्यांनी ही माहिती दिली. 'लोकमत'ने शालार्थ आयडी घोटाळा लावून धरला असून, आतापर्यंत २० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी संदीप जोशी यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता.


या प्रकरणात एसआयटी नेमण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला हिरवा कंदिल दाखविला होता. मात्र, अद्याप एसआयटी समिती नेमण्यात आली नाही. ही समिती कधीपर्यंत घोषित करण्यात येईल, तसेच संपूर्ण राज्यात झालेल्या नियुक्त्या, बदल्या, शाळा हस्तांतरण, तसेच शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या प्रकरणातील राज्यव्यापी घोटाळ्याची चर्चा करणार का व अनेक फाइल्स मंत्रालयात मागील पाच-सहा वर्षांपासून दाबून ठेवणाऱ्या शिक्षण विभागातील झारीतील शुक्राचार्यावर कारवाई करणार काय, असे प्रश्न जोशी यांनी उपस्थित केले.


नागपूर विभागात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशन समाप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आयएएस, आयपीएस, विधि अधिकारी यांचा संयुक्त सहभाग असलेल्या चौकशी समितीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती भोयर यांनी दिली, तसेच ५९ शिक्षणाधिकाऱ्यांसंदर्भातील मागील पाच सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फाइलसंदर्भात तातडीने दखल घेत ती फाइल मागवून घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.

Web Title: SIT to be formed within a month in Shalarth ID scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर