श्री साईंच्या चरण-पादुका आज नागपुरात; विविध राज्यातील भाविकांची मांदियाळी, आगमन आणि भव्य मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 22:47 IST2025-10-09T22:47:05+5:302025-10-09T22:47:37+5:30
Nagpur News: देश-विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या चरण पादुकांचे आज नागपूर नगरीत आगमन होणार आहे. त्यानिमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध राज्यांतील भाविक या सोहळ्यात सहभागी होतील.

श्री साईंच्या चरण-पादुका आज नागपुरात; विविध राज्यातील भाविकांची मांदियाळी, आगमन आणि भव्य मिरवणूक
नागपूर - देश-विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या चरण पादुकांचे आज नागपूर नगरीत आगमन होणार आहे. त्यानिमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध राज्यांतील भाविक या सोहळ्यात सहभागी होतील.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या विशेष सहकार्याने श्री सद्गुरु साई चॅरिटेबल ट्रस्ट, साई पालखी परिवार आणि साई भक्त साई सेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई चरण पादुका दर्शन महोत्सव २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून भाविकांची तयारी सुरू आहे. शहराच्या सीमा भागातील चिंचभवन चौकात शुक्रवारी दुपारी ३ वाजता श्री साईबाबांच्या पवित्र पादुकांचे आगमन होणार आहे. श्री साई पादुका एका आकर्षक रथात आसनस्थ केल्या जातील. यानंतर भाविकांनी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. यात दिंडी, पताका, ढोल-ताशे, बॅण्ड पथक आणि हजारो भक्तांकडून बाबांचा जयघोष करत ही मिरवणूक चिंचभवन ते महाल असा मार्गक्रमण करणार आहे. रस्त्याच्या विविध ठिकाणी पालखीचे भक्तांकडून स्वागत करण्यात येईल.
मिरवणुकीचा मार्ग असा राहील
चिंचभुवन चौक, सोमलवाडा, राजीव नगर, नरेंद्र नगर, मानेवाडा, क्रीडा चौक, महाल, बदकस चौक, गडकरी वाडा ते चिटणीस पार्क या मार्गाने फिरून श्रींच्या पादुकांची मिरवणूक शुक्रवारी रात्री ९ वाजता चिटणीस पार्क, महाल येथे पोहोचेल. येथे ढोल-ताशा पथक, शंख पथक, बॅण्ड पथक, लेझीम पथकाचे प्रदर्शन, गंगा आरती, फटाका शो आणि नेत्रदीपक लाईट शोचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारपासून दर्शन सोहळा
चितणीस पार्क, महाल येथे ठेवलेल्या बाबांच्या चरण पादुकांच्या दर्शनाची सुरुवात भाविकांसाठी शनिवारी (दि. ११) सकाळी साडेपाच वाजता सुरू होईल. ही दर्शन सोय रविवारीपर्यंत उपलब्ध राहील. भाविकांनी आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी मोठ्या संख्येने या दर्शन सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन साईभक्तांनी केले आहे.