महाराष्ट्रात घडली लज्जास्पद घटना, धावत्या बसमध्ये तरुणीवर नराधमाने केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 16:19 IST2021-01-11T16:04:41+5:302021-01-11T16:19:48+5:30
Rape Nagpur News गोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पाच आणि सहा जानेवारीच्या रात्री वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली.

महाराष्ट्रात घडली लज्जास्पद घटना, धावत्या बसमध्ये तरुणीवर नराधमाने केला बलात्कार
नागपूर: गोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पाच आणि सहा जानेवारीच्या रात्री वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली. या तरुणीने पुणे पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून पोलिसांनी प्रकरण मालेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे तपासासाठी मालेगाव पोलिसांकडे पाठविले आहे. मालेगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून समीर नामक आरोपीचा शोध घेतला जात आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, पाच जानेवारीला ही तरुणी गोंदियाहून पुण्यासाठी खासगी बसने निघाली. बराच वेळ तिला बसायला सीट मिळाली नाही. मालेगावजवळ बस आल्यानंतर तिने कंडक्टरला सीट मागितली. कंडक्टरने तिला सर्वात शेवटची सीट दिली. मात्र बस सुरू झाल्यावर कंडक्टरने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर दोनदा बलात्कार केला. पुण्यात उतरल्यानंतर या तरुणीने आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलावून सर्व घटना सांगितली. त्यांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठले. मात्र हा गुन्हा मालेगावच्या हद्दीत असल्याने तो मालेगाव पोलिसांकडे पाठवण्यात आला.
या घटनेसंदर्भात पत्रकारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शक्ती कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.