धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 06:37 IST2026-01-03T06:35:27+5:302026-01-03T06:37:05+5:30
गेल्या तीन-चार महिन्यांपासून आई-वडील मुलाला बांधून ठेवत असल्याने त्याच्या हाता-पायाला जखमा झाल्या आहेत.

धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले
नागपूर : ज्या आई-वडिलांच्या कुशीत मुलाला सुरक्षिततेची भावना मिळायला हवी, त्याच कुशीतून क्रौर्याचे दर्शन घडावे, अशी हादरवून टाकणारी घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मुलगा चुकीचे वागतो, या कारणावरून आई-वडिलांनी आपल्या अवघ्या १२ वर्षांच्या मुलाच्या हात-पायांना साखळी व कुलूप लावून बांधून ठेवल्याची बाब समोर आली आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून आई-वडील मुलाला बांधून ठेवत असल्याने त्याच्या हाता-पायाला जखमा झाल्या आहेत.
मुलगा चुकीचे वागतो म्हणून असली क्रूर शिक्षा -
या मुलाचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करतात. दिवसभर सोबत मोठे कुणीच नसल्याने मुलगा चुकीचे वागू लागला होता. त्यामुळे आई-वडील कामासाठी जाताना त्याला साखळी व कुलपाने बांधायचे व कामावरून आल्यानंतर त्याला मोकळे करायचे.
या मुलाबाबत चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तत्काळ धाव घेतली. तेव्हा तेथे भयभीत अवस्थेत, थरथर कापणारा मुलगा आढळून आला.