निशांत वानखेडे, नागपूरशालार्थ आयडी घोटाळ्यामुळे नागपूर विभागात शैक्षणिक कामांना लकवा मारल्यासारखी स्थिती झाली आहे. विभागीय शिक्षण मंडळात अध्यक्ष व सचिव नसल्याने प्रशासकीय कामात अडथळे येत असून, याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. सध्या १२वीचे पुनर्मुल्यांकनाचे काम सुरू आहे. यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे गुण वाढतील, त्यांच्या गुणवाढीला मंजुरी कोण देणार, नवी गुणपत्रिका कशी तयार होणार, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी पुढे जात असल्याने अधिकाऱ्यांच्या गैरप्रकाराचे घबाड उजेडात येत आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होत आहे. या कारवाई अंतर्गतच बोर्डाचे सचिव व प्रभारी अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांचे निलंबन होणेसुद्धा निश्चित आहे. त्यामुळे बोर्डाच्या कामावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
वाचा >>आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
विशेष म्हणजे १२ वीच्या निकालानंतर गुणांवर आक्षेप असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. नागपूर विभागातून तब्बल २४१५ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज केला होता. त्यांच्यापैकी आतापर्यंत २११ विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला, ज्यांच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मुल्यांकनाचे काम सुरू आहे. याशिवाय २२६ विद्यार्थ्यांचे रिटोटलिंगचे अर्जही प्राप्त झाले आहेत.
पुनर्मुल्यांकनाचे काम रखडण्याची शक्यता
उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांची जुनी गुणपत्रिका घेऊन नवीन गुणपत्रिका द्यावी लागणार आहे. मात्र पुनर्मुल्यांकनाची फाईल मंजूर करण्यासाठी गुणपत्रिका छापण्यापूर्वी त्यावर सचिवाची स्वाक्षरी होणे आवश्यक आहे. हीच प्रक्रिया दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही लागू आहे. ही प्रक्रिया झाली नाही, तर विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनाचे काम रखडण्याची शक्यता आहे.
२४ जूनपासून दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षासुद्धा सुरू होणार आहे. तत्पूर्वी पुनर्मुल्यांकनाचे निकाल हाती आले नाही, तर यात उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही परीक्षेला सामोरे जावे लागेल, ही शक्यता नाकारता येत नाही.
सर्वत्र अनिश्चितता
नियमांनुसार, कोणतेही सरकारी पद इतके दिवस रिक्त राहू शकत नाही. समतुल्य अधिकाऱ्याला अतिरिक्त जबाबदारी सोपवणे आवश्यक आहे. परीक्षा मंडळातील अध्यक्षपद आधीच रिक्त आहे. त्यावर सचिव राहिलेल्या चितामण वंजारी यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. शिवाय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अटकेनंतर त्यांचे पदही वंजारी यांना देण्यात आले होते.
आता वंजारी यांनासुद्धा अटक झाल्याने तिन्ही पदे रिक्त झाली आहेत. यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत चालणारी शालेय कर्मचाऱ्यांची पेन्शनची कामे, मेडिकल बिल आणि आकस्मिक तक्रारींचे निवारण करण्यासही कुणी उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वत्र अनिश्चितता पसरली आहे.