आरटीई घोटाळ्यातील आरोपींनी दिले होते बनावट रहिवासी पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:38 IST2025-07-22T17:37:40+5:302025-07-22T17:38:22+5:30

सदर पोलिसांचा दावा : न्यायालयामध्ये १३ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

RTE scam accused gave fake residence proofs | आरटीई घोटाळ्यातील आरोपींनी दिले होते बनावट रहिवासी पुरावे

RTE scam accused gave fake residence proofs

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
सदर पोलिसांनी सोमवारी आरटीई प्रवेश घोटाळ्यातील १० आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयामध्ये १३ हजार ४८ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींनी बनावट रहिवासी पुरावे तयार करून त्या आधारावर आरटीईच्या २५ टक्के राखीव कोट्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश पक्के केले होते, असा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.


आरोपींमध्ये प्रशांत हेडाऊ, राजेश बुवाडे, राजा जमशेद शरीफ, रूपाली धगगाये ऊर्फ रुकसार सैयद, रोहित पिल्ले, शुभम चुटे, अनिल मेश्राम, मंगेश झोटिंग, प्रदीप भांगे व पल्लवी हेडाऊ यांचा समावेश आहे.


हा घोटाळा २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामधील आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी शाहीद जमशेद शरीफ हा फरार असून तो आरटीई प्रवेशाकरिता बनावट कागदपत्रे तयार करत होता. दरम्यान, तालुका पडताळणी समितीच्या चौकशीमध्ये आरोपी पालक प्रशांत हेडाऊने वेळाहरीतील पोद्दार शाळेत तर, राजेश बुवाडेने शंकरपूरमधील रॉयल गोंडवाना शाळेत बनावट रहिवासी पुरावा सादर केल्याचे आढळून आले. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी कवडू दुर्गे यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७२, २०१, ३४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.


त्यानंतर घोटाळ्याच्या तपासाकरिता विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे व इतरांनी प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत.


इतर गुन्हेही उघड
या घोटाळ्याच्या तपासादरम्यान शाहिद व राजाचे इतरही गुन्हे उघडकीस आले. आरोर्पीनी राहत्या घरात प्राणघातक शस्त्रे ठेवली होती. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तसेच, राजा व पिल्ले यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे आणि राजा व इतरांनी मध्यप्रदेश जंगलामध्ये वन्यप्राण्यांची शिकार केल्याचे पुरावेही मिळाले. या प्रकरणांमध्येसुद्धा गुन्हे दाखल केले गेले आहेत.

Web Title: RTE scam accused gave fake residence proofs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.