रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

By आनंद डेकाटे | Updated: September 8, 2025 18:58 IST2025-09-08T17:21:45+5:302025-09-08T18:58:16+5:30

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : आमदार रोहित पवार यांनी “मी एका कंपनीला ९० कोटी रुपयांचा दंड माफ केला” असा आरोप केला. त्यांनी हा आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा.

Rohit Pawar should prove the allegations, otherwise he should retire from politics; Revenue Minister Chandrashekhar Bawankule's counterattack | रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

Rohit Pawar should prove the allegations, otherwise he should retire from politics; Revenue Minister Chandrashekhar Bawankule's counterattack

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
आमदार रोहित पवार यांनी “मी एका कंपनीला ९० कोटी रुपयांचा दंड माफ केला” असा आरोप केला. त्यांनी हा आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा, असा पलटवार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

महसूल मंत्री बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी रोहित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. बावनकुळे म्हणाले, मी एका कंपनीला ९० कोटी रुपयांचा दंड माफ केला, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा. त्यांनी केलेला उल्लेख हा जुना आहे. तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या प्रकरणात केवळ स्थगिती दिली होती. कुठलाही दंड माफ केलेला नव्हता. माझ्या कार्यकाळातही कुठलाही दंड माफ झालेला नाही.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये काय झाले, कोणत्या जाहिराती दिल्या गेल्या, कोणत्या धनदांडग्यांनी त्या दिल्या, खंडणी कशी वसूल केली गेली हे रोहित पवारांनी एकदा नीट पाहावे असेही बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवरायांना नतमस्तक होत हे राज्य महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसाठी समर्पित आहे असा संदेश देणारी जाहिरात कुणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमापोटी दिली, तर रोहित पवारांच्या पोटात का दुखत आहे? खोट्या आरोपातून प्रसिद्धी मिळत नाही. रोहित पवार यांनी अभ्यास न करता उठसुट आरोप करणे म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

ओबीसी आरक्षणाबाबत सरकार ठाम

ओबीसी प्रश्नावरही बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही ओबीसींचे नुकसान होईल असा निर्णय घेतलेला नाही. उलट राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करून न्याय दिला आहे. ओबीसींच्या ताटातलं आरक्षण कुणाच्याही ताटात जाऊ दिले जाणार नाही.

दहा सप्टेंबरला ओबीसी उपसमितीची बैठक होणार असून त्यात छगन भुजबळ, पंकजा मुंडे, दत्ता भरणे, गुलाबराव पाटील यांच्यासह सहा-सात मंत्री सहभागी होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना आरक्षणाबाबत काही शंका असल्यास त्यांनी त्या उपसमितीकडे मांडाव्यात. राजकीय स्टंट करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. ओबीसी प्रमाणपत्राबाबत ते म्हणाले, योग्य कागदपत्रांशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही. अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून प्रमाणपत्र निघणार नाही.

रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीवर केलेल्या टीकेवर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे प्रेम कमावले आहे. प्रेमापोटी एखादी जाहिरात दिली, तर यात विरोधकांच्या पोटदुखीचं कारण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Rohit Pawar should prove the allegations, otherwise he should retire from politics; Revenue Minister Chandrashekhar Bawankule's counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.