कळमेश्वरवासीयांना प्यावे लागते दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:19 IST2025-05-08T17:15:53+5:302025-05-08T17:19:10+5:30

नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह : पिण्यायोग्य असल्याचा नगरपालिकेचा दावा

Residents of Kalameshwar have to drink foul-smelling, muddy water | कळमेश्वरवासीयांना प्यावे लागते दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी

Residents of Kalameshwar have to drink foul-smelling, muddy water

आशिष सौदागर 
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर :
शहराला नगरपालिका प्रशासनाच्यावतीने नियमित पाणीपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून नळाला गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, नागरिकांना तेच पिण्यासाठी वापरावे लागते. या पाण्यामुळे नागरिकांना आजार होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली असली तरी ते पिण्यायोग्य असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाने केला आहे.


पाणीटंचाई असल्याने कळमेश्वर ब्राह्मणी शहराला आधीच तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना जुलाब, पोटदुखी, ओकाऱ्या, मळमळ होणे अशी लक्षणे दिसायला लागली आहेत. लहान मुले वयोवृद्धांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. काही नागरिकांनी या पाण्याचे नमुने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखविले. मात्र, अधिकाऱ्यांनी ते पाणी शुद्ध असल्याचे सांगून पिण्यायोग्य असल्याचा दावा केला आहे. काही नागरिकांनी शहरातील विविध भागातील पाण्याचे नमुने घेऊन ते नागपूर शहरातील वेगवेगळ्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. या नमुन्यांच्या दोन चाचण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


जलशुद्धीकरण संयंत्र कुचकामी
शहराला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जलशुद्धीकरण संयंत्र बसविले आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. याच जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांच्या घरांमध्ये येत असलेल्या नळाला पिवळसर व गढूळ पाणी येत आहे. या पाण्याची हलकी दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.


स्कॉडा प्रणाली विकसित

  • नगरपालिका पाणीपुरवठ्यावर दरवर्षी एकूण एकूण १४ कोटी रुपयांचा खर्च करते. शहराला इटनगोटी जलाशय, गोवरी व कळंबी येथील बोअरवेल्समधून पाणीपुरवठा केला जातो.
  • अशुद्ध पाण्याचा उपसा, जलशुद्धीकरणाचा अभाव, पाणीपुरवठा व्यवस्थापनातील चुका, पाण्याच्या टाक्यांची साफसफाई, पाणीपुरवठा विभागातील अपुरे मनुष्यबळ तसेच दुरुस्ती कामांना होणारी दिरंगाई यामुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
  • शहराला समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा म्हणून स्कॉडा प्रणाली विकसित केली आहे.


"इटनगोटी जलाशयातील पाण्याची पातळी खोल गेल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुरटी व ब्लिचिंग पावडरचा वापर वाढविण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणावर भर दिला जात आहे. दोन दिवसात ही समस्या निकाली निघून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल."

- आकाश सुरडकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, कळमेश्वर-ब्राम्हणी

Web Title: Residents of Kalameshwar have to drink foul-smelling, muddy water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.