Rains : विदर्भात २९ ऑक्टोबरला ऑरेंज अलर्ट ! 'या' जिल्ह्यांत 'मोंथा' चक्रीवादळाचा होणार सर्वाधिक प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 20:40 IST2025-10-28T20:39:42+5:302025-10-28T20:40:05+5:30
Nagpur : विदर्भातील शेतकरी वर्गाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने, हवामान खात्याने पिकांचे आणि फळबागांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

Rains : Orange alert in Vidarbha on October 29! Cyclone 'Montha' will have the most impact in these districts
Vidarbha Rain : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचाप्रभाव आता महाराष्ट्रातील विदर्भावर दिसू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवसांसाठी नागपूरसह काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने २९ ऑक्टोबरला चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वारा ४०-५० किमी प्रति तासाच्या गतीने जाण्याची शक्यता सांगितली आहे.
विदर्भातील कोणते जिल्हे अलर्टवर?
हवामान खात्याच्या मते, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. काही ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि अचानक पाऊस होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना
विदर्भातील शेतकरी वर्गाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने, हवामान खात्याने पिकांचे आणि फळबागांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाची तयारी
नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन दल, पोलीस, आणि महापालिका यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. संवेदनशील भागांत पथकं तैनात करण्यात आली असून, नदीकिनाऱ्यांवरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भावर थेट परिणाम
‘मोंथा’ चक्रीवादळाचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागराच्या पश्चिम किनाऱ्याकडे सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे पूर्व महाराष्ट्रातील वातावरणात ओलावा वाढला असून, ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. हवामान विभागाने नागरिकांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आणि कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास १०७७ या जिल्हा नियंत्रण क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.