Rain : नागपूरमध्ये अवकाळीचा हाहाकार ! कळमना मार्केटमध्ये उघड्यावरील कोट्यवधींचा शेतमाल भिजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:52 IST2026-04-02T15:50:13+5:302026-04-02T15:52:14+5:30
Nagpur : विदर्भात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला आहे. नागपुरात काल मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने नागपूरच्या कळमना बाजारपेठेत विक्रीसाठी आलेला शेतमाल पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Unseasonal rains wreak havoc in Nagpur! Agricultural goods worth crores of rupees soaked in open water in Kalamana market
नागपूर : विदर्भात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला आहे. नागपुरात काल मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने नागपूरच्या कळमना बाजारपेठेत विक्रीसाठी आलेला शेतमाल पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन विक्रीच्या वेळी निसर्गाचा हा कोप झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून, बाजार परिसरात हताश करणारे चित्र पाहायला मिळत आहे.
संरक्षण व्यवस्था नसल्याने फटका कळमना ही विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते, जिथे दररोज हजारो क्विंटल धान्य आणि इतर पिके विक्रीसाठी येतात. मात्र, ही बाजारपेठ खुली असल्याने आणि तिथे पावसापासून संरक्षणाची कोणतीही ठोस शेडची व्यवस्था नसल्याचे आज पुन्हा एकदा उघड झाले आहे. काल रात्री अचानक आलेल्या पावसाने उघड्यावर पडलेले धान्य, सोयाबीन आणि इतर पिकांच्या राशी पूर्णपणे ओल्या झाल्या. बाजार समितीच्या ढसाळ नियोजनामुळे कष्टाने पिकवलेला हा शेतमाल आज मातीमोल होण्याची वेळ आली आहे.
गुणवत्ता खालावली, भावाचा प्रश्न गंभीर पावसात भिजल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. धान्य ओले झाल्याने त्याला लवकर कीड लागण्याची किंवा ते सडण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, या भिजलेल्या मालाला बाजारात योग्य भाव मिळेल की नाही, याबद्दल मोठी साशंकता आहे. व्यापारी अशा मालाला अत्यंत कमी दराने मागणी करत असल्याने, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासनाकडून मदतीची मागणी दिवसरात्र शेतात राबून आणि मोठ्या अपेक्षेने बाजारात आणलेला माल डोळ्यांदेखत वाया गेल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. केवळ व्यवस्थापनाच्या अभावामुळे आणि पावसाळी शेड नसल्यामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप केला जात आहे. आता झालेल्या या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने आणि बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.