कैद्यांची कमाई सव्वातीन कोटींहून अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:27 IST2018-05-26T23:27:14+5:302018-05-26T23:27:24+5:30
विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैदी विविध कामदेखील करत असतात. २०१७ पासून १४ वर्षांत या कैद्यांनी केलेल्या निरनिराळ्या कामांतून थोडेथोडके नव्हे तर चक्क सव्वातीन कोटींहून अधिकचे उत्पादन केले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

कैद्यांची कमाई सव्वातीन कोटींहून अधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध कारणांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोठ्या प्रमाणावर कैदी विविध कामदेखील करत असतात. २०१७ पासून १४ वर्षांत या कैद्यांनी केलेल्या निरनिराळ्या कामांतून थोडेथोडके नव्हे तर चक्क सव्वातीन कोटींहून अधिकचे उत्पादन केले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर कारागृहात किती कैदी आहेत, कैदी कुठल्या प्रकारचे काम करतात व त्यातून किती उत्पन्न प्राप्त झाले याबाबत नागपूर मध्यवर्ती कारागृहाकडे विचारणा केली होती. यावर मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत कैद्यांनी केलेल्या कामातून कारखाना विभागाला ३ कोटी ३७ लाख ४९ हजार ५१ रुपयांचे उत्पन्न झाले. या कामांमध्ये सुतारकाम, विणकाम, यंत्रमाग, शिवणकाम, लोहारकाम, बेकरी, कार वॉशिंग व धोबीकाम यांचा समावेश आहे. सर्वाधिक ९२ लाख ४८ हजार ७०६ रुपयांचे उत्पन्न हे विणकामातून मिळाले.
दोन महिन्यांत उत्पन्नात वाढ
२०१७ या वर्षभरात मध्यवर्ती कारागृहातील कारखाना विभागाचे एकूण उत्पन्न हे २ कोटी ६७ लाख ९६ हजार १४२ इतके होते. दर महिना सरासरी उत्पन्न हे २२ लाख ३३ हजार इतके होते. जानेवारी व फेब्रुवारी २०१८ या दोन महिन्यांतच कारखाना विभागाने ६९ लाख ५२ हजार ९०९ रुपयांचे उत्पादन केले. २०१७ च्या तुलनेत २०१८ मधील सरासरी उत्पन्नात वाढ दिसून आली.
कामनिहाय उत्पन्न
काम उत्पन्न
सुतारकाम ६४,८८,२८७
विणकाम ९२,४८,७०६
पॉवरलूम ५०,६२,९३१
टेलरिंग १९,९०,२२४
लोहारकाम ६९,९६,३०९
बेकरी २०८४,५१०
कार वॉशिंग १२,३८,५७१
लॉन्ड्री ६,३९,५१३
कारागृहात फाशी मिळालेले २७ कैदी
दरम्यान, नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा मिळालेल्या २७ कैद्यांना ठेवण्यात आले आहे. यात दोन महिलांचादेखील समावेश आहे तर दोन कैद्यांना अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले ३६७ कैदी, सक्षम कारावास भोगत असलेले ४१४, मोक्का अंतर्गत ८४ यांचादेखील समावेश आहे. ८ नक्षलवादीदेखील याच कारागृहात कैद आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहात ९ विदेशी कैदीदेखील आहेत. कारागृहात एकूण २ हजार १७८ कैदी शिक्षा भोगत आहेत. यात ६३ महिला कैद्यांचादेखील समावेश आहे.