मनपा निवडणूक : आघाडीबाबत संभ्रम, भाजप लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 02:48 PM2021-10-18T14:48:56+5:302021-10-18T14:57:07+5:30

सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे.

preparation for nagpur Municipal election begins | मनपा निवडणूक : आघाडीबाबत संभ्रम, भाजप लागली कामाला

मनपा निवडणूक : आघाडीबाबत संभ्रम, भाजप लागली कामाला

Next
ठळक मुद्देकाँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत, शिवसेना-राष्ट्रवादीची होणार युती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. परंतु, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षाची आघाडी होईल की नाही, ही बाब अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही. तर, दुसरीकडे भाजप पक्ष मात्र पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.

भाजप गेल्या वर्षभरापासूनच इलेक्शन मोडवर आहे. शनिवारी रात्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्ते, नेते, नगरसेवक यांना नागरिकांशी थेट संपर्क वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश देण्यात आले.

मागील १५ वर्षांपासून नागपूर महापालिकेवर भाजपची सत्ता असल्याने एंटीइनकंबंसीचा धोका आहे. त्यामुळे भाजप अधिक सक्रिय झाली आहे. लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी विस्तारकांची नियुक्ती केली जात आहे. प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या १५१ पैकी १०८ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत, परंतु मागील दोन वर्षांपासून मनपाकडून विकासकामे बंद आहेत. कोरोना संक्रमणाचा परिणामही निवडणुकीवर दिसून येत आहे. ज्या पक्षाचे नेते कोरोना काळात भूमिगत झाले होते त्यांना नागरिक स्वत:च बाहेर फेकण्याच्या मनस्थितीत आहेत.

शनिवारच्या बैठकीत हे निश्चित झाले की भाजप नगरसेवकांचे काम आणि त्यांचा असलेला जनसंपर्क याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. यानंतरच तिकीट दिले जातील. कुणाचेही तिकीट निश्चित नसल्याचेही सांगितले जाते, परंतु भाजपने जास्तीत जास्त नगरसेवकांचे तिकीट कापले आणि नवीन उमेदवारांना संधी दिली तर त्याचा चुकीचा परिणामही पडू शकतो. भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्यामुळे मनपा निवडणूक पाहता काही अनुभवी नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. कोण किती प्रभावशाली राहील हे तर येणारी वेळच ठरवेल.

शनिवारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेबाबतही चर्चा झाली. गिरीश व्यास यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी कुणाला संधी द्यावी. यावरही चर्चा झाली. पदवीधर मतदारसंघात भाजपच्या संदीप जोशी यांना काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मात दिली. त्यामुळे भाजप यावेळी अधिक दक्ष आहे.

काँग्रेसमधील गटबाजी कायम

काँग्रेसमध्ये अजूनही गटबाजी कायम आहे. मनपा निवडणुकीच्या तयारी संदर्भात काँग्रेसची अजूनपर्यंत एकही मोठी बैठक झालेली नाही. इतकेच नव्हे तर बूथ स्तरावरील कार्यकर्ते व नेत्यांची नियुक्ती सुद्धा झालेली नाही. मागील १५ वर्षांपासून सत्तेत असलेले भाजप काहीही करू न शकल्याने यावेळी त्यांना लाभ हाेईल, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. बहुतांश काँग्रेस नेते शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार नाही. त्यांचे म्हणणे आहे की, चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत राष्ट्रवादीला केवळ १ आणि शिवसेनेचे २ नगरसेवकच जिंकू शकले. त्यामुळे त्यांना अधिक जागा देण्याचे काहीच कारण नाही. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत लहान पक्षांना फायदा होत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस करणार युती

काँग्रेससाेबत आघाडी होत नसली तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षाचे नेते यासाठी अनुकूल आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस २५-२५ जागांची मागणी करीत आहेत. तर काँग्रेस त्यांना १२ ते १५ जागा देण्याच्या मनस्थितीत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस उत्साहात आहे. त्यामुळे काँग्रेसवाले स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: preparation for nagpur Municipal election begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.