लोकसंख्या अन् सीमाक्षेत्र वाढले, मात्र कचरा संकलन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:24 AM2020-10-31T11:24:18+5:302020-10-31T11:27:29+5:30

Nagpur news नागपूर शहराची लोकसंख्या आणि सीमाक्षेत्र वाढले आहे. परंतु, त्या तुलनेत शहरातील कचरा संकलन वाढत नसून, उलट विस्मयकारी घट होताना दिसत आहे.

Population and border areas increased, but waste collection decreased | लोकसंख्या अन् सीमाक्षेत्र वाढले, मात्र कचरा संकलन घटले

लोकसंख्या अन् सीमाक्षेत्र वाढले, मात्र कचरा संकलन घटले

googlenewsNext
ठळक मुद्दे दररोजचे २५० मेट्रिक टन संकलन कमी झाले शहराच्या कचरा संकलन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

राजीव सिंह

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या आणि सीमाक्षेत्र वाढले आहे. परंतु, त्या तुलनेत शहरातील कचरा संकलन वाढत नसून, उलट विस्मयकारी घट होताना दिसत आहे. घरादारातून आणि बाजारातून होणारे कचरा संकलन दररोज साधारण २३० ते २५० मेट्रिक टनांनी घसरत आहे. या स्थितीने मनपा प्रशासन आनंदात आहे. मात्र, या आनंदाला संशयाचे वळण आहे, हे विशेष. कचरा संकलनासाठी दिला जाणारा मोबदला पूर्वी जास्त होता का किंवा वर्तमानात नियुक्त कंपन्यांकडून कचरा संकलनाबाबत मनमानी केली जात आहे, असे प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहेत.

२१ मार्चपासून नागपुरात टाळेबंदी लागू झाली. त्यापूर्वी जानेवारी महिन्यात रोज ११८०.५२, फेब्रुवारीमध्ये ११४५.५०, मार्चमध्ये १०३६.५० मेट्रिक टन कचरा संकलन झाले. टाळेबंदीच्या काळात हॉटेल, मॉल, मार्केट आदी बंद असल्याने कचरा संकलनात घट झाली, हे मानले जात होते. मात्र, अनलॉक प्रक्रियेनंतरही कचरा संकलनात वाढ झाली नाही. यावरून, या प्रक्रियेत काहीतरी गडबड गोंधळ किंवा कंपन्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या वर्षीपर्यंत सरासरी दर महिन्यात ११५० ते १२०० मेट्रिक टन कचरा संकलन होत होता. त्यातच नोव्हेंबरमध्ये मनपाने कचरा संकलन व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी झोन एक ते पाच पर्यंतची जबाबदारी ए.जी. एन्वायरोकडे सोपवली तर झोन सहा ते १०ची जबाबदारी बीवीजी कंपनीला देण्यात आली. परंतु, दोन्ही कंपन्यांच्या नियुक्तीनंतर येत असलेल्या आकडेवारीवरून कचरा संकलनात प्रचंड घसरण नोंदवली जात आहे. दोन स्वतंत्र कंपन्यांच्या हातात शहरातील कचरा संकलन व्यवस्था आल्यानंतर संकलनाचा दर घसरून ११०० ते ११६० मेट्रिक टन दरम्यानच आहे.

टाळेबंदीनंतर संकलनाची स्थिती १००० मेट्रिक टनच्याही खाली आली होती तर अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही संकलनाची स्थिती ९३० ते ९३५ मेट्रिक टनच्या जवळपासच राहिली आहे. मार्च महिन्यात शहरातून ३२१३१.७५ मेट्रिक टन कचरा जमा झाला होता तर सप्टेंबर महिन्यात २८०८६.६१ मेट्रिक टन कचरा संकलन झाले होते.

एक दिवसाआड येत आहेत गाड्या

शहराच्या सीमावर्ती भागात कचरा संकलनासाठी गाड्या रोज येत नाहीत. एक दिवसाआड येत असल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावर, मोकळ्या भूखंडावर वगैरे फेकताना दिसतात. पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील बहुतांश वस्त्यांमध्ये कचरागाड्यांच्या अनियमिततेच्या तक्रारी नागरिक नगरसेवकांकडे करत आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष आहे. विजयादशमीनंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरादारातील साफसफाईची प्रक्रिया गतिशील होत असते. त्यामुळे, या काळात मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. गाडी येत नसल्याने कचरा रस्त्यावर दिसण्याची शक्यता आहे.

मनपा प्रशासनाचा अंदाज

- सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित होत असल्याने वजन कमी भरत असल्याचा अंदाज मनपाच्या घनकचरा विभागाचा आहे.

- बांधकामासंदर्भातील कचरा, निर्माण सामग्रीसंबंधातील कचरा, माती उचलण्यावर सक्तीचे निर्बंध आहेत.

- संकलन व्यवस्थेवर टेहळणी वाढविण्यात आली आहे आणि अकस्मात भेटीही दिल्या जात आहेत.

 

Web Title: Population and border areas increased, but waste collection decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.