नियम मोडाल तर पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST2021-02-23T04:12:52+5:302021-02-23T04:12:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वारंवार आवाहन केल्यानंतरही शहरातील नागरिक कोविड नियमांचे पालन करीत नाहीत. संसर्ग वाढत असल्याने ...

Police action if rules are broken | नियम मोडाल तर पोलीस कारवाई

नियम मोडाल तर पोलीस कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वारंवार आवाहन केल्यानंतरही शहरातील नागरिक कोविड नियमांचे पालन करीत नाहीत. संसर्ग वाढत असल्याने अखेर सोमवारी प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले. ७ मार्चपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालय, लॉन आदी बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी . यांनी दिले आहेत.

मनपा व पोलीस प्रशासन संयुक्त कारवाई करणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी लोकमतला दिली. शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. मास्क शिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. बाजारातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानंतरही नियम मोडले तर साथरोग नियंत्रण अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलीस कारवाई केली जाणार आहे. आता कोणतीही सूट दिली जाणार नाही. आयुक्तांच्या आदेशानंतर अंमलबजावणीसाठी नियोजन सुरू आहे. मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू असल्याची माहिती आहे.

सध्या एनडीएस पथकामार्फत मास्क न लावणे, मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींवर कारवाई केली जात आहे. आता संबंधितांवर आठवडी बाजार बंद करणे व रात्री ९ पर्यंत हॉटेल, रेस्टाॅरन्ट, बार, उपहारगृह आदी बंद करण्याची जबाबदारी सोपविली जाईल. दुसरीकडे सीताबर्डी, इतवारी, महाल, गांधीबाग, जरीपटका, खामला, धरमपेठ, गोगुळपेठ आदी बाजार भागातील गर्दीवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार तीनवेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जास्तीतजास्त ५० हजार रुपये दंड लावला जाणार आहे. त्यानंतर मंगल कार्यालय, लॉन, सभागृह सील करण्यात येईल. आदेशानुसार कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. तसेच संक्रमितांचा शोध घेऊन परिसर सील करण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर आधीच देण्यात आली आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांच्या डाव्या हातावर होम क्वारंटाईन असल्याचा शिक्का मारण्याचे आदेश चार दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे.

...

दोन दिवस ढील कशासाठी ?

मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदी ठिकाणी होणारे लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रमांवर २५ फेब्रुवारीपासून बंदी घालण्यात आली आहे. दोन दिवसानंतर कारवाई होणार असल्याने दोन दिवस ढील कशासाठी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Police action if rules are broken