संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत ठरणार शताब्दी वर्षाचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 21:21 IST2025-06-23T21:21:08+5:302025-06-23T21:21:08+5:30

दिल्लीत सरसंघचालकांच्या उपस्थितीत होणार मंथन

planning for the centenary year will be decided at the all india provincial pracharak meeting of the rss | संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत ठरणार शताब्दी वर्षाचे नियोजन

संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत ठरणार शताब्दी वर्षाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय पातळीच्या प्रांत प्रचारक बैठकीचे दिल्लीत आयोजन करण्यात येणार आहे. ४ ते ६ जुलै या कालावधीत होणाऱ्या या बैठकीत संघाच्या शताब्दी वर्षाच्या नियोजनावर भर राहणार आहे.

संघाच्या प्रणालीनुसार दरवर्षी अखिल भारतीय पातळीवरील प्रांत प्रचारकांच्या बैठकीचे आयोजन होत असते. संघाच्या संघटनात्मक रचनेत एकूण ११ क्षेत्र व ४६ प्रांत आहेत. यंदाच्या बैठकीत देशातील सर्व प्रांत प्रचारक, सह प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक व सहक्षेत्र प्रचारक सहभागी होतील. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सहसरकार्यवाह डॉ. कृष्णा गोपाल, सी. आर. मुकुंदा, अरुण कुमार, रामदत्त, आलोक कुमार, अतुल लिमये यांच्यासह अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य व विविध कार्य विभागाचे प्रमुख, सह-प्रमुख या बैठकीत उपस्थित राहतील.

येत्या विजयादशमीपासून संघाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने संघाकडून देशभरात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने झालेल्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्याचे काम या बैठकीत होईल. त्याचप्रमाणे या बैठकीत संघाच्या नुकत्याच संपलेल्या प्रशिक्षण वर्गांचा अहवाल आणि आढावा, सरसंघचालकांचा पुढील वर्षाचा प्रवास आराखडा यावरदेखील चर्चा होईल. मार्चमध्ये आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर आगामी योजनेच्या अंमलबजावणीची रूपरेषा आखण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. दिल्लीत केशव कुंज या संघाच्या कार्यालयात ही बैठक होईल, असे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: planning for the centenary year will be decided at the all india provincial pracharak meeting of the rss