ऐनवेळी विमानात बिघाड, फ्लाइट कॅन्सल ! संतापलेल्या प्रवाशांनी केले विमानतळावरच आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:44 IST2025-10-18T17:38:33+5:302025-10-18T17:44:11+5:30
Nagpur : फ्लाइटमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करणार होते. या घडामोडीमुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून विमानतळावरच ठिय्या मांडला.

Plane malfunctions at the last moment, flight canceled! Angry passengers protest at the airport
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने किशनगढ, राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांचा रोष उफाळून आला. संतप्त प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या मांडून आंदोलन केले.
नागपूरहून किशनगड (राजस्थान)ला जाणारी स्टार एअरची फ्लाइट क्रमांक एस ५-१९१ दुपारी १२:३५ वाजता उड्डाण करण्याच्या तयारीत होती. मात्र, १२:३० वाजता विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून काही वेळ वाट बघण्याचा सल्ला वजा सूचना प्रवाशांना मिळाली. दरम्यान, थोडा वेळ थांबा, असे सांगितल्यावर काही वेळाने हे विमान रद्द करण्यात आल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा रोष उफाळून आला.
फ्लाइटमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करणार होते. या घडामोडीमुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून विमानतळावरच ठिय्या मांडला. यानंतर सुमारे दीड तासाने एअरलाइनने प्रवाशांच्या अल्पोपाहाराची (नाश्त्याची) व्यवस्था केली. दुपारी ३ वाजेपर्यंत पर्यायी विमानाबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवासी चांगलेच संतप्त झाले. अनेकांनी या संबंधाने आपली भावना नोंदविताना आम्ही दिवाळीच्या निमित्ताने नातेवाइकांकडे जात होतो, आता आमचे पूर्ण नियोजन बिघडल्याचे म्हटले. तर काहींनी व्यावसायिक कारणामुळे जाण्याचे ठरविले होते. आता ते शक्य होणार नसल्याचे सांगून नाराजी नोंदविली.
प्रवासी महेंद्र शर्मा यांनी सांगितले, आम्ही सकाळी १० वाजल्यापासून विमानतळावर होतो. शेवटच्या क्षणी सांगण्यात आले, की विमानात बिघाड झाला आणि फ्लाइट रद्द केली आहे. त्यानंतर एअरलाइनच्या कुठल्याही अधिकाऱ्याने ठोस माहिती दिली नाही. पूर्ण रिफंड दिला जाईल, असे सांगून तोंडाला पाने पुसण्यात आल्याची भावनाही त्यांनी नोंदविली.
अनेकांचा अपेक्षाभंग
या घडामोडीमुळे दुपारी अनेक प्रवासी नाराज होऊन घरी परत गेले. काहीजण मात्र पर्यायी व्यवस्था होईल, या आशेपोटी विमानतळावरच थांबले होते. मात्र, त्यांचाही अपेक्षाभंग झाला. दिवाळीच्या हंगामात अशा प्रकारचा बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या एअरलाइन व्यवस्थापनाविरोधात अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला.