धावत्या ट्रेनमधून फोन पडला... घाबरू नका ! 'हे' करा, तुम्हाला तुमचा फोन नक्की मिळेल
By नरेश डोंगरे | Updated: October 25, 2025 20:45 IST2025-10-25T20:44:19+5:302025-10-25T20:45:09+5:30
घ्या आरपीएफची डिजिटल मदत : तुमचा फोन नक्की मिळेल

Phone dropped from a moving train... Don't panic! Do 'this', you will definitely get your phone back
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धावत्या ट्रेनमधून तुमचा फोन खाली पडला तर... घाबरू नका. गोंधळून उलटसुलट काहीही करू नका. फोन ट्रेन बाहेर पडला तर पुढील उपाय करा. तुमचा फोन नक्की तुम्हाला परत मिळेल.
रेल्वेने प्रवासाला निघालेले अनेक जण वेळ घालविण्यासाठी आपल्या आप्तांना, मित्रांना फोन लावून निर्धास्तपणे गप्पा मारतात. कुणी खिडकीजवळ बसून तर कुणी दाराजवळ उभे राहून मोबाइलवर बोलतात. जोशात हातवारेही करतात. अशावेळी अनेकदा कुणाचा फोन हातून सटकतो आणि तो गाडीखाली पडतो. यावेळी फोनधारकाचा एकच गोंधळ उडतो. काय करावे, ते सूचतच नाही. काही जण अशावेळी चेन पुलिंग करून ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, असले काहीही करण्याची गरज नाही.
हे सोप्पं सरळ करा
रुळाच्या बाजूला रेल्वेचे किलोमीटर मार्कर पोल (खांब) असतात. त्यावर साइड ट्रॅक नंबर असतो. तो लगेच नोंद करून बाजूच्या एखाद्याच्या फोनवरून रेल्वेची हेल्पलाइन नंबर १३९ किंवा १५१२ वर फोन करा. त्यांना फोन कुठे पडला ते मार्कर पोलच्या नंबरसह सांगा. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) ट्रॅक पेट्रोलिंग करणारे कर्मचारी त्या ठिकाणी शोध घेऊन तुमचा फोन ताब्यात घेतील आणि पुढच्या काही दिवसानंतर तो फोन परत मिळवता येईल.
डिजिटल सिस्टममुळे लाखो फोन सापडले. रेल्वेच्या तपास यंत्रणा आता चांगल्याच हायटेक झाल्या आहेत. आरपीएफने डिजिटल सिस्टमचा वापर करून जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत देशभरात सुमारे ८४ कोटींची मालमत्ता शोधून ज्याची त्यांना परत केली. ज्यात लाखो मोबाइल फोन्सचाही समावेश आहे.
अन्यथा होईल दंड !
ट्रेनमधून फोन खाली पडल्यानंतर गोंधळात, तणावात येऊन रेल्वेची चेन पुलिंग (साखळी ओढणे) करू नका. कारण आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तरच चेन पुलिंग करण्यास मुभा आहे. फोन पडला म्हणून चेन पुलिंग केल्यानंतर ट्रेन थांबेल. कुणी चेन ओढली ते लगेच स्पष्ट होईल आणि व्यक्तिगत कारणामुळे चेन पुलिंग करून हजारो प्रवाशांना वेठीस धरण्याच्या आरोपात तुमच्यावर रेल्वे अॅक्टनुसार कारवाई होईल. ५ हजार रुपयांचा दंडही होऊ शकतो.