रोडवर बाजूला होण्यावरून हॉर्न वाजवला, पादचाऱ्याने लोखंडी कड्याने केली तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:11 IST2026-03-05T19:09:49+5:302026-03-05T19:11:05+5:30

Nagpur : रोडवर पायी चालणाऱ्यांनी थोडे बाजूला व्हावे म्हणून कारचालक तरुणाने हॉर्न वाजविला आणि भांडणाला सुरुवात झाली. तरुण कारच्या खाली उतरताच पादचाऱ्याने त्याच्या डोक्यावर हातातील लोखंडी कड्याने जबर वार केले.

Pedestrian kills young man with iron rod after honking horn to avoid being pulled over on road | रोडवर बाजूला होण्यावरून हॉर्न वाजवला, पादचाऱ्याने लोखंडी कड्याने केली तरुणाची हत्या

Pedestrian kills young man with iron rod after honking horn to avoid being pulled over on road

लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी :
रोडवर पायी चालणाऱ्यांनी थोडे बाजूला व्हावे म्हणून कारचालक तरुणाने हॉर्न वाजविला आणि भांडणाला सुरुवात झाली. तरुण कारच्या खाली उतरताच पादचाऱ्याने त्याच्या डोक्यावर हातातील लोखंडी कड्याने जबर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून, कामठी (जुनी) पोलिसांनी आरोपीस अटक केली. या घटनेमुळे कामठीतील धुळवडीला गालबोट लागले. ही घटना कामठी शहरातील खलाशी लाइन परिसरात मंगळवारी (दि. ३) सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली.

रवी शिवकुमार अरगुटलेवार (२७, रा. बजरंग पार्क, कामठी) असे मृत तरुणाचे तर अक्षय धनराज गेडाम (३०, रा. खलाशी लाइन, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रवी व त्याचा मित्र मोनिश सुमेम अबडवार (२५, रा. मच्छीपूल, कामठी) मंगळवारी सायंकाळी एमएच-४०/डीई-४६४२ क्रमांकाच्या कारने घोरपड (ता. कामठी) येथून कामठी शहरात येत होते. मोनिश कार चालवित होता तर रवी बाजूला बसला होता. ते कामठीतील प्रबुद्ध वाचनालयाजवळ पोहोचताच समोर अक्षय गेडाम हा त्याच्या बहीण, वहिनी व पुतणीसोबत पायी घराकडे जात होता. 

चौघांनी थोडे बाजूला व्हावे म्हणून मोनिशने हॉर्न वाजविला. मात्र, अक्षय बाजूला न होता शिवीगाळ करीत थेट रवीच्या दिशेने कारकडे चालत आला व त्याने भांडणाला सुरुवात केली. रवी कारच्या खाली उतरताच भांडण विकोपास केले आणि अक्षयने रवीच्या डोके व पाठीवर हातातील लोखंडी कड्याने जोरात वार केले. तो गंभीर जखमी होताच अक्षय पळून गेला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, ठाणेदार प्रशांत जुमळे व महेश आंधळे, पोलिस उपनिरीक्षक आकाश महल्ले, मिलिंद मेश्राम, सागर भंडारी यांनी अक्षयचा शोध घेत त्याला कामठीतून ताब्यात घेत अटक केली. 

तणावसदृश स्थिती

या घटनेची माहिती मिळताच मृत रवीच्या कुटुंबीयांसह नागरिक मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास कामठी (जुनी) पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात गोळा झाले. त्यांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी करताच तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिस उपायुक्त डॉ. निखिल पखाले यांनी रवीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे सकारात्मक आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले. त्यानंतर रात्री उशिरा कामठी (जुनी) पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०३ (१) गुन्हा दाखल केला.

उपचारादरम्यान मृत्यू

लोखंडी कड्याने जबर वार केल्याने गंभीर दुखापत झाली व रवी खाली कोसळला. कोसळताच सिमेंट रोडवर डोके आदळल्याने तो आणखी जखमी झाला व घटनास्थळीच बेशुद्ध पडला. मोनिशने परिसरातील नागरिकांच्या मदतीने रवीला जवळच असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. प्रथमोपचारानंतर त्याला नागपूर शहरातील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

Web Title : हॉर्न बजाने पर विवाद, कामठी में पैदल यात्री ने की हत्या।

Web Summary : कामठी में हॉर्न बजाने को लेकर हुए विवाद में एक पैदल यात्री ने लोहे के कड़े से युवक पर जानलेवा हमला कर दिया। इलाज के दौरान युवक की मौत हो गई, आरोपी गिरफ्तार। घटना खलाशी लाइन के पास हुई, जिससे होली के रंग में भंग पड़ गया।

Web Title : Argument over honking leads to fatal attack in Kamthi.

Web Summary : In Kamthi, a pedestrian fatally attacked a young man with an iron bangle after an argument over honking. The victim died during treatment, and the accused has been arrested. The incident occurred near Khalaashi Line, casting a shadow over the Holi celebrations.